अभिषेक शर्मा किंवा ट्रॅव्हिस हेड नाही तर ‘हा’ खेळाडू करणार टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा, डेल स्टेनची भविष्यवाणी
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुरुवातीला आता फारसा वेळ उरलेला नाही. 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेपूर्वी क्रिकेटविश्वात विविध अंदाज आणि भविष्यवाण्या व्यक्त केल्या जात आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने एक धक्कादायक भविष्यवाणी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील प्रश्नोत्तर सत्रात स्टेनला विचारण्यात आले की, टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोण करेल? यावर उत्तर देताना त्याने भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा किंवा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ट्रॅविस हेड यांचे नाव न घेता दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डिकॉक याच्यावर विश्वास दाखवला. “मला वाटते की क्विंटन डिकॉक सर्वाधिक धावा करेल,” असे थेट उत्तर स्टेनने दिले.
डिकॉक आणि स्टेन यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी अनेक वर्षे एकत्र खेळ केला आहे. 33 वर्षीय डिकॉकचा टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील रेकॉर्डही प्रभावी आहे. आतापर्यंत त्याने 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळत 2771 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 30.78 असून स्ट्राइक रेट 140 पेक्षा अधिक आहे. या काळात त्याच्या नावावर एक शतक आणि 18 अर्धशतकांची नोंद आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्येही डिकॉकने 9 सामन्यांत 243 धावा करत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्या स्पर्धेत तो एकूण चौथ्या क्रमांकावर होता, मात्र अंतिम सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, डेल स्टेनने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड याचंही भरभरून कौतुक केलं आहे. स्टेनच्या मते, हेड हा सध्याच्या टी20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे. “ट्रॅव्हिस हेडला कोणत्याही गोलंदाजाची भीती वाटत नाही असं वाटतं. त्याच्याकडे गमावण्यास काहीच नसल्यासारखं तो खेळतो, आणि त्यामुळे गोलंदाजांसाठी तो मोठी डोकेदुखी ठरतो,” असं स्टेन म्हणाला. हेडने आतापर्यंत 47 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 156.67 च्या स्ट्राइक रेटने 1197 धावा केल्या आहेत.
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये स्टेनची ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही, हे पाहणं आता क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
Comments are closed.