इंदूरमध्ये डान्स ऑफ डेथ

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना स्फोट : 8 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ इंदूर

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बुधवारी अग्नितांडवाची हृदयद्रावक घटना घडली. इलेक्ट्रिक वाहन (इव्ही) चार्जिंग पॉईंटचा स्फोट झाल्यानंतर घराला लागलेल्या भीषण आगीत कुटुंबातील 8 जणांना प्राण गमवावे लागले. बुधवारी सकाळी एका घरात लागलेली ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. संपूर्ण घर जळून खाक झाले असून, घरातील बहुतांश जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेवेळी घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होत गेल्यामुळे या घटनेची गंभीरता वाढली. घरात काही ज्वलनशील रसायनेही ठेवण्यात आल्यामुळे आग भडकली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

इंदूरच्या बृजेश्वरी नेक्स निवासी भागात आगीची दुर्घटना घडली. प्राथमिक तपासानुसार घराबाहेर एक इलेक्ट्रिक वाहन चार्ज केले जात असताना चार्जिंग पॉईंटमध्ये स्फोट झाला. यानंतर वाहनातून घरात आग पसरली. सदर दुर्घटनाग्रस्त घर पॉलिमरचा व्यवसाय करणाऱ्या मनोज पुगलिया यांचे असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असल्याचे इंदूरचे पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी सांगितले. तीन जणांना वाचवण्यात आले आहे. बचावकार्यादरम्यान एका लहान मुलाचा मृतदेहही सापडला.

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याची एक साधी प्रक्रिया बुधवारी पहाटे कोणाचा तरी जीव घेईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. घराबाहेर पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे केवळ मशीनला आग लागली नाही, तर एकाच कुटुंबातील आठ सदस्यांचा क्षणार्धात मृत्यू झाला. मध्य प्रदेश पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घरात 10 पेक्षा जास्त गॅस सिलिंडर ठेवलेले होते, त्यापैकी अनेकांचा एकापाठोपाठ एक स्फोट झाला असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

Comments are closed.