दापोली मंडणगडमध्ये वृक्ष तोडीचा हैदोस; वन विभागाच्या आशिर्वादानेच होतोय वन संपत्तीचा नाश

एकिकडे झाडे लावा झाडे जगवा चा शासनाकडून संदेश दिला जातो तर दुसरीकडे मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेल्या वन विभागाच्या आशिर्वादानेच राजरोसपणे झाडांची कत्तल केली जात आहे. निसर्ग सृष्टी सौंदर्याच्या संपन्नतेने नटलेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यात वृक्ष तोडीचा अक्षरशः हैदोस सुरू आहे. अगदी राजरोसपणे झाडांची कत्तल होत असतानाही वन विभाग मात्र बघ्याची भूमिकाच निभावताना दिसत आहे.

दापोली आणि मंडणगड तालुक्यात बेसुमार वृक्षतोड होत असताना लाकुड माफिया हे वन विभाग आपल्या खिशात असल्याचे भासवत व्यापारी आणि दलाल यांच्या संगनमताने वृक्ष तोड करत आहेत. अशा या केल्या जाणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीमुळे येथील पर्जन्यमानावर तर विपरीत परिणाम होतोच शिवाय पर्यावरणाचा -हास होत आहे. वातावरणाचा समतोल बिघडवणा-या वृक्षतोडीच्या प्रकाराबाबत दापोली आणि मंडणगड तालुका वनपाल हे डोळ्यावर पट्टी बांधून जणू काही घडतच नाही अशाप्रकारची भुमिका निभावताना दिसत आहेत. या सर्व प्रकाराला वन परिक्षेत्र मंडळ दापोलीचे कार्यालय जबाबदार आहे. वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आधार तालूका वन कार्यालय घेत असल्याने आर्थिक मांडवळीचा खेळ राजरोसपणे सुरु आहे. त्यामुळेच दापोली तसेच मंडणगड तालुक्यातील वनसंपदा संपुष्टात येण्याचा धोका वाढला आहे.त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा शासनाचा संदेश अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळेच येथे पायदळी तुडवला गेला आहे.

Comments are closed.