Dapoli News – ‘मार्केट डे’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उमटली लघुउद्योगाची जाणीव’

श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट च्या डेरवण येथील इंग्लिश मिडियम शाळेत ‘मार्केट डे’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या अथवा पालकांची मदत घेऊन बनविलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स लावून खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. प्रत्येक विद्यार्थी या दिवशी लहान उद्योजक व विक्रेता बनला होता.

मार्केट मध्ये विद्यार्थ्यांनी सजावटी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, दिवाळी विशेष उत्पादने, खाद्यपदार्थ, पेये, चटपटीत चाट आणि पारंपरिक पदार्थ अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. शोपीस, फ्रिज मॅग्नेट्स, पेपर बुके, शुभेच्छा कार्डे, कापडी पिशव्या, पर्स, पेन स्टँड, कंदील, रांगोळी, फराळाचे पदार्थ, चॉकलेट मिल्कशेक, भेळ, कॉर्न चाट, तसेच केळ्याचे पीठ, पापड, मेतकूट अशा अनेक हॅन्डमेड वस्तूंनी स्टॉल्स गजबजून गेले होते. आकर्षक ‘सेल्फी पॉईंट’ देखील तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी सौजन्यपूर्ण संवाद साधत व्यवहार कौशल्य, गणितीय ज्ञान, जमा- खर्च नोंद आणि संवादकौशल्य यांचा उत्कृष्ट वापर केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकता, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित करण्याची संधी मिळाली.

‘मार्केट डे’ उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी श्रीम. गंधारेखा बारपाटे, यश कापडी आणि ओंकार तांबे या शिक्षकांनी पार पाडली. पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि कर्मचारीवर्ग यांच्या उपस्थितीत ‘मार्केट डे’ उत्साहात साजरा झाला. प्रशालेच्या संचालिका शरयू यशवंतराव यांनी सांगितले की, पालकांनी या नवोपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांनी स्वतः मेहनतीने वस्तू तयार केल्याचे सांगितले आणि शाळेने असा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची जाणीव, व्यवहार कौशल्य आणि सर्जनशीलता वाढीस लागते.

Comments are closed.