आता मला फक्त घरी जायचंय! हिंदुस्थानात अडकलेल्या डॅरेन सॅमी यांची आर्त हाक
आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे वेस्ट इंडीजचा संघ गेल्या पाच दिवसांहून अधिक काळ हिंदुस्थानात अडकून आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ‘मला फक्त घरी जायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.
अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर आखाती प्रदेशातील काही हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना मायदेशी परतण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वेस्ट इंडीज संघाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास सुपर-एट फेरीत संपला होता. त्यानंतर संघाला परतीचा प्रवास करता आलेला नाही. दरम्यान, काही खेळाडू हिंदुस्थानातच थांबण्याची शक्यता असून, लवकरच सुरू होणाऱ्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी सराव शिबिरांमध्ये ते सहभागी होऊ शकतात. रोवमन पॉवेल, शेफर्ड रुदरपर्ह्ड, सिमरॉन हेटमायर आणि रोमारिओ शेफर्ड हे खेळाडू आयपीएल संघांसोबत जोडलेले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीवर ‘आयसीसी’ लक्ष ठेवून असून, संघासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, वेस्ट इंडीजचा संघ अद्याप कोलकात्यात अडकून आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, ‘आम्हाला मायदेशी परतायचे आहे. आम्ही किमान कधी जाऊ शकतो, याबाबत स्पष्ट माहिती तरी द्यावी,’ अशी मागणी केली आहे.
Comments are closed.