डॅरिल मिचेलसाठी भारत लकी! मागील चार वनडेत ठोकली ‘इतकी’ शतके

भारत विरुद्ध न्यूझीलंड राजकोट वनडे (14 जानेवारी) सामना चांगलाच थरारक झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या भन्नाट खेळीने भारताला 7 विकेट्सने हा सामना गमवावा लागला. यामुळे तीन सामन्यांची ही वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मिचेलची भारतात भारताविरुद्ध मागील चार वनडे सामन्यांतील आकडेवारी पाहिली तर धक्काच बसेल.

राजकोट वनडेत आपले कारकिर्दीतील आठवे शतक ठोकणाऱ्या मिचेलने भारतात भारताविरुद्ध खेळलेले मागील चार वनडे सामने चांगलेच गाजवले आहेत. त्याने या चार सामन्यात तीन शतकी आणि एक अर्धशतकी खेळी करत 159.66च्या सरासरीने 479 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या 2023च्या विश्वचषक स्पर्धेच्या दोन शतकांचा समावेश आहे.

भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात भारताविरुद्धच्या धरमशाला येथे झालेल्या साखळी सामन्यात मिचेलने 130 धावा आणि मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये 134 धावा अशा उल्लेखनीय खेळी केल्या होत्या. हे दोन्ही सामने भारताने जिंकले, मात्र नुकतेच झालेल्या राजकोट वनडेमध्ये त्याने केलेले शतक न्यूझीलंडच्या कामी आले. तसेच त्याने वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडेतही 84 धावा केल्या होत्या. यावरून तो भारताविरुद्ध वनडे प्रकारात चांगलाच यशस्वी ठरताना दिसत आहे.

त्याचबरोबर मिचेल भारतात भारताविरुद्ध तीन वनडे शतके ठोकणारा पहिलाच न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी नॅथन ऍस्ट्ले याने 2 शतके केली होती. तसेच मिचेल न्यूझीलंडसाठी वनडेत सर्वात जलद 2500चा आकडा पार करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यत 53 डावांत 56.73 सरासरीने 2553 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 18 जानेवारीला इंदौर येथे खेळला जाणार आहे.

Comments are closed.