स्कूल बसचालकांच्या हालचालींवर वॉच, विद्यार्थ्यांची सुरक्षा मजबूत होणार; डॅश कॅम टिपणार स्कूल बसचा प्रवास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारा स्कूल बसचालक गाडी कशी चालवतो, त्याच्या हालचाली कशा आहेत यावर आता वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी ८ हजार स्कुल बसेसवर डॅश कॅम बसवण्यात येणार असल्यामुळे मुला-मुलींचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. हा डॅश कॅम स्कूल बसेसचा मार्ग आणि पुढील व मागील दृश्य टिपणार आहे. अत्याधुनिक डॅश कॅम बसवण्याच्या सूचना सर्व स्कूल बसचालकांना वाहतूक शाखेने दिल्या आहेत.

ठाणे शहर व परिसरातील स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक आज वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्कूल बसच्या आतील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पण बस चालू असताना बाहेरील भागाची दृश्य टिपली जात नाहीत. दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर नेमकी चूक कुणाची हे या डॅश कॅममुळे लगेच कळणार आहे. बसचालक कशा प्रकारे गाडी चालवतो हेदेखील समजेल.

डॅश कॅम म्हणजे एक छोटा व्हिडीओ कॅमेरा असून तो ड्रायव्हिंग सुरू असताना समोरील रस्ता व ट्रॅफिकची दृश्य सतत रेकॉर्ड करत असतो. एखादा गैरप्रकार घडल्यास ही दृश्य पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

स्कूल बसच्या मालकांनाही चालकांच्या कामकाजावर देखरेख ठेवता येणार आहे. स्कूल बस शाळा भरण्यापूर्वी व सुटण्यापूर्वी अर्धा तास आधीच शाळेजवळ उभ्या कराव्यात. त्यामुळे वाहतूककोंडी टळेल अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलीस तसेच अन्य प्राधिकरणे व प्रशासन, परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन, बसमालक व चालक यांनी समन्वयाने काम केल्यास शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व निर्धास्त होईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पंकज शिरसाट, (उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा)

Comments are closed.