डेव्हिड वॉर्नर अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायालयात मोठी कबुली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. आता वॉर्नरने ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा कबूल केला आहे.

वॉर्नरवर व्हॅन चालवत असताना रँडम तपासणी केंद्राच्या अगोदर वाहन थांबवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याची ब्रेथ टेस्ट करण्यात आली. या चाचणीत वॉर्नरने कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक मद्यपान केल्याचे समोर आले. तो स्वतः वाहन चालवत असल्याने पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस ठाण्यात नेले. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली, मात्र हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी डेव्हिड वॉर्नर न्यायालयात उपस्थित राहिला नाही. त्याच्या वतीने त्याचे वकील सिडनी येथील न्यायालयात हजर राहिले आणि मध्यम स्तरावरील ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा कबूल करणारी याचिका दाखल केली.

यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या सुनावणीदरम्यान वॉर्नरचे वकील बॉबी हिल म्हणाले होते, “आपल्यापैकी अनेक जण अशा प्रकारचे चुकीचे निर्णय घेतात. मात्र, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या चुका स्वीकारणे आणि त्याची जबाबदारी घेणे.”

आपल्या याचिकेत वॉर्नरच्या वकिलांनी असेही म्हटले होते, “तुम्ही उद्योगपती असाल, डॉक्टर असाल किंवा जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक असाल, यामुळे काहीही फरक पडत नाही. हा धोका आपल्यापैकी प्रत्येकासाठी तितकाच आहे.”

अशा प्रकारे डेव्हिड वॉर्नरने ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात आपली चूक कबूल केली आहे. दरम्यान, क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर वॉर्नर जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे.

Comments are closed.