पालघरच्या समुद्रात डे-नाईट वॉच; पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सागरी यंत्रणा सतर्क

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सागरी यंत्रणा सतर्क झाली आहे. पालघरच्या समुद्रावर डे-नाईट वॉच ठेवण्यात आला असून खाडीकिनाऱ्यांवरदेखील 24 तास पेट्रोलिंग सुरू केले आहे. सागरी क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांतर्गत मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला असून संशयास्पद हालचालींवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पालघरचा समुद्रकिनारा अतिशय महत्त्वाचा असून बारीक सारीक हालचालीदेखील टिपण्यात येत आहेत. दरम्यान पालघरचा समुद्र व खाड्या सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
22 एप्रिल रोजी कश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निघृण हल्ला केला. या गोळीबारात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सागरी सुरक्षा यंत्रणेने विशेष दक्षता घेतली आहे. पालघर जिल्ह्याला 108 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून हजारो मच्छीमार खोल समुद्रात जाऊन मच्छीमारी करतात. मासेमारी करताना काही खलाशांनी हिंदुस्थानची सागरी हद्द ओलांडून नजरचुकीने पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केला होता, असे अनेक मच्छीमार सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत.
108 किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर तसेच खोल समुद्रातदेखील बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन आणि कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बारीक सारीक संशयास्पद हालचालही ड्रोनद्वारे टिपली जाणार असून त्वरित सागरी यंत्रणा अलर्ट होणार आहे. या अत्याधुनिक साधनसामग्रीमुळे पोलिसांचे बळ वाढणार आहे. पालघरचा समुद्र तसेच खाडीकिनाऱ्यांवर कोणतीही गडबड होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचे आदेश दिले.
मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ, तटरक्षक दल, सीमाशुल्क विभाग, पोलीस दल अशा विविध यंत्रणांकडून संयुक्त सागरी गस्त राबवण्यात येत आहे. सागरी क्षेत्रांमधील लैंडिंग पॉईंट, कोस्टल पोस्ट, मर्मस्थळ अशा प्रमुख ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व सुरक्षा यंत्रणा यांना संदेशाद्वारे सतर्क राहण्याचे संदेश देण्यात आले आहेत.
मच्छीमारांशी थेट संपर्क
खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या खलाशांसोबत थेट संपर्क साधण्यासाठी सागरी सुरक्षारक्षक दलाने स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून त्याद्वारे 24 तास एकमेकांशी बोलता येणार आहे. स्थानिक मच्छीमार सोसायटीनेदेखील त्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Comments are closed.