DC vs PBKS: 'हा' ठरला दिल्लीच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

आयपीएल 2025 च्या 66 व्या सामन्यात (DC vs PBKS) दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 6 विकेट्सनी पराभव करत हंगामाचा शेवट विजयी केला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 207 धावांचे आव्हान 3 चेंडू राखून पूर्ण केले. (Delhi Capitals Beat Punjab Kings)

नाणेफेक जिंकून दिल्लीने पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. पंजाबकडून प्रियांश आर्य लवकर बाद झाला, मात्र जोश इंग्लिस आणि प्रभसिमरन सिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या. दिल्लीकडून विप्राज निगमने दोघांनाही बाद करत सामना पकडला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 53 धावा केल्या. शेवटी मार्कस स्टोइनिसने 16 चेंडूत नाबाद 41 धावांची झंझावाती खेळी करत पंजाबचा डाव 206 धावांपर्यंत नेला. तर दिल्लीकडून मुस्तफिजूर रहमानने 3 बळी घेतले. (DC vs PBKS Match Highlights)

प्रत्युत्तरात दिल्लीने केएल राहुल (35) आणि फाफ डु प्लेसिस (23) यांच्या 55 धावांच्या भागीदारीने चांगली सुरुवात केली. मात्र मधल्या फळीत काही विकेट्स पडल्याने सामन्याचे गणित दिल्लीसाठी थोडे कठीण झाले. मात्र करुण नायर आणि समीर रिझवी यांनी 62 धावांची भागीदारी करत सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने वळवला. ही भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. (Turning Point Of the Match)

करुण नायरने 27 चेंडूत 44 धावा केल्या, तर समीर रिझवीने 25 चेंडूत नाबाद 58 धावा करत सामन्याचा निकाल निश्चित केला. शेवटच्या दोन षटकांत 22 धावांची गरज असताना रिझवीने स्टब्सच्या साथीने सहज लक्ष्य गाठले. दिल्लीने हा सामना 6 विकेट्सनी जिंकून हंगामाचा सुखद शेवट केला.

Comments are closed.