भारतीय सैन्य मोदींच्या चरणी नतमस्तक आहे; उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद, Video व्हायरल

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानच्या हद्दीतील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सैन्य दलाच्या लष्कर प्रमुखांसोबत या कालावधीत सातत्याने बैठका घेत होते. त्यामुळे, केंद्र सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने भारती सैन्य दलाने देदीप्यमान कामगिरी बजावत पाकिस्तानला धडा शिकवला. देशभरातून या एअर स्ट्राईकचं कौतुक होत असून भारतीय सैन्य दलास आणि सीमारेषेवरील जवानांना (Indian army) सॅल्यूट केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी भाजप मंत्र्‍याने कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्यानंतर, आता भाजप नेते (BJP) आणि मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होत आहे. भारतीय सैन्य दलाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल, असे विजय शाह यांनी म्हटले होते. विजय शाह यांच्या या वक्तव्यावरुन देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर, मंत्री महोदयांनी माफी मागत आपला तसा कुठलाही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. आता, मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करुन जगदीश देवडा यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, या देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक असल्याचे वक्तव्य देवडा यांनी केल्याचं दिसून येतं. देशाच्या यशस्वी पंतप्रधानांचे आभार मानायला हवे. संपूर्ण देश, देशाचे सैन्य, ते सैनिक मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत, त्यांच्या चरणी संपूर्ण देश नतमस्तक आहे. मोदींनी जे उत्तर दिलंय, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असेही देवडा यांनी या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते. सध्या त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटीझन्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणनीती आणि त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच आपण पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवला, असे जगदीश देवडा यांना सांगायचं होतं. देशाची सीमारेषा पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित असून याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

बाल वाड्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही; संजय राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्र्यांची खोचक प्रतिक्रिया

अधिक पाहा..

Comments are closed.