क्षणात मृत्यू समोर आला; साडीचा आधार घेत तामिळनाडूतील 21 यात्रेकरूंनी गाठला सुरक्षित डोंगर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेपाळ-तिबेट सीमेजवळ अचानक आलेला पूर, डोंगरावरून कोसळणारे महाकाय दगड आणि चिखलाचा प्रचंड लोंढा… मृत्यू काही क्षणांवर येऊन ठेपला होता. अशा भीषण परिस्थितीत तामिळनाडूतील 21 वृद्ध यात्रेकरूंसाठी एका साडीने जीवनरेषेचे काम केले आणि त्यांचे प्राण वाचले. चेन्नईला परतलेल्या या यात्रेकरूंनी नेपाळमधील त्या भयावह प्रसंगाची थरारक कहाणी सांगितली. शुक्रवारी रात्री काठमांडूहून चेन्नईला पोहोचलेल्या या 21 जणांना बचावाची वाट पाहत जवळपास दीड दिवस कठीण परिस्थितीत काढावा लागला.

कुंभकोणमधील एका ट्रॅव्हल एजन्सीमार्फत तीन बसमधून 57 यात्रेकरू रसुवाहून प्रवास करत होते. त्यातील एका बसला चिखलामुळे अडथळा निर्माण झाल्याने ताफा काही काळ थांबला. याच काही मिनिटांच्या विलंबामुळे काही यात्रेकरूंचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे. वेलाचेरीतील मुरुगु नगर येथील रहिवासी नवू कबीरदास आणि त्यांच्या पत्नी विजया भुवनेश्वरी हेही या गटात होते. कबीरदास यांनी सांगितले की, अचानक बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर व्हॅनवर दगड कोसळू लागले. काही क्षणांतच धरण फुटल्यासारखे पाणी वेगाने आमच्या दिशेने आले. धोका लक्षात येताच नेपाळी चालकाने सर्व प्रवाशांना वाहनातून उतरून डोंगराच्या दिशेने धावण्यास सांगितले.

गटातील 21 जणांपैकी बहुतांश प्रवासी 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. पुराच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना चिखलाच्या उतारावरून डोंगराकडे चढावे लागले. मात्र, चिखलामुळे वारंवार पाय घसरत होते. याच वेळी गटातील पूंगोडी नावाच्या महिलेने धाडसी निर्णय घेतला. तिने आपली साडी काढून ती वरच्या बाजूला असलेल्या केबलला बांधली. ही साडी खालील प्रवाशांसाठी आधार बनली. भुवनेश्वरी यांनी सांगितले की, आम्ही साडी आणि केबल घट्ट पकडून वर चढलो. एक महिला मात्र एकटी चढू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या कमरेला साडी बांधली आणि गटातील इतर सदस्यांनी तिला वर खेचून घेतले. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.

कांचीपुरम येथील पंचायत युनियन शाळेच्या मुख्याध्यापिका सत्या यांनीही त्या प्रसंगाचे वर्णन केले. त्या म्हणाल्या की, यात्रेकरू सकाळी आठच्या सुमारास श्याब्रुबेसीहून चिनी इमिग्रेशनच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्यांना अचानक मोठ्या प्रमाणात धूळ उडताना दिसली. काही क्षणांतच 70 ते 80 फूट उंच दगड आणि चिखलाचा प्रचंड लोंढा त्सुनामीच्या लाटेसारखा त्यांच्या दिशेने येताना दिसला. डोंगर चढण्याचा प्रयत्न केला की चार फूट वर गेल्यानंतर पाच फूट खाली घसरत होतो असे सत्या यांनी सांगितले. चढाई करत अखेर हे यात्रेकरू सशस्त्र पोलीस दलाच्या छावणीपर्यंत पोहोचले. तेथे त्यांना पाणी आणि बिस्किटे देण्यात आली. ज्या प्रवाशांच्या मोबाइलला सिग्नल मिळत होता, त्यांच्या मदतीने त्यांनी आपण सुरक्षित असल्याचे कुटुंबीयांना कळवण्यासाठी एक फोटो तामिळनाडूला पाठवला. मात्र, या बचावप्रवासातही त्यांना अनेक धक्के बसले. दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी यात्रेकरूंना झुडपांमधून आणि अरुंद वाटांवरून जवळपास तीन तास चालावे लागले.

अखेर लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने या यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यानंतर ते काठमांडू आणि नवी दिल्लीमार्गे चेन्नईला पोहोचले. या दुर्घटनेत काही यात्रेकरूंचे पासपोर्ट आणि महत्त्वाची कागदपत्रेही हरवली. मात्र, जीव वाचल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

Comments are closed.