महोत्सव ‘डेक्कन क्वीन’चा… प्रवासी मराठी, फलक हिंदी-इंग्रजीत! मध्य रेल्वेच्या मराठीद्वेषाचा कहर! ‘हिंदी’ला घेतले डोक्यावर, मातृभाषेला डावलले
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कायमची बंद करून दादर-गोरखपूर ट्रेन कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेणाऱया मध्य रेल्वे प्रशासनाचा मराठीद्वेष शुक्रवारी पुन्हा दिसला. मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱया प्रतिष्ठत ‘डेक्कन क्वीन’ एक्प्रेसच्या महोत्सवाच्या मुख्य फलकावरून मराठी भाषेला ‘डच्चू’ देण्यात आला. फलकावर हिंदी भाषेला प्रथम, तर इंग्रजीला दुसरे स्थान दिले. मात्र मराठीचा एक चकार शब्दही लिहिला नाही. रेल्वे प्रशासनाच्या या मराठीद्वेष्टय़ा भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मध्य रेल्वेने शुक्रवारी सायंकाळी ‘डेक्कन क्वीन’ (दख्खनची राणी) एक्प्रेसचा महोत्सव आयोजित केला होता. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्र. 11 च्या मध्यभागी ‘ट्रेन महोत्सव’चा मोठा फलक लावला होता. त्यावर ‘डेक्कन क्वीन’च्या गौरवशाली इतिहासाची माहिती देताना मराठी भाषेचा वापर टाळला. मातृभाषेला डावलतानाच हिंदी व इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले. किंबहुना, प्लॅटफॉर्मवर गाडी दाखल होताच हिंदी भाषेतून उद्घोषणा करून गाडीचे स्वागत करण्यात आले. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरे महाराष्ट्रातील असून गाडीचे बहुतांश प्रवासी मराठी असतात. असे असताना रेल्वे प्रशासनाने महोत्सवाच्या फलकावर मराठी भाषा का डावलली, असा सवाल प्रवाशांनी केला. आधीच दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसह महाराष्ट्रातील इतर काही गाडय़ा मध्य रेल्वेने कायमच्या बंद केल्या आहेत. त्यावरून रेल्वे प्रशासनाचा महाराष्ट्र-मराठीबद्दलचा आकस प्रवाशांच्या संतापाच्या पेंद्रस्थानी आहे. त्यात ‘ट्रेन महोत्सवा’च्या दिखाव्यात मध्य रेल्वेने मराठी भाषेची गळचेपी केल्यामुळे मराठी भाषाप्रेमी आणि प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्रवासी संघटनांची महोत्सवाकडे पाठ
‘डेक्कन क्वीन’ ही महाराष्ट्रातील रेल्वे गाडय़ांपैकी एक प्रतिष्ठत गाडी आहे. या गाडीच्या महोत्सवाला प्रवासी संघटना तसेच प्रवाशांची हजेरी अपेक्षित होती. मात्र दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनबाबत दुजाभाव अनुभवायला मिळाल्याने प्रवासी संघटनांनी महोत्सवाकडे पाठ फिरवली. मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील गाडय़ा बंद करून परराज्यातील गाडय़ांना प्राधान्य दिले आहे. त्यावरून जनभावनेचा उद्रेक झाला असल्याने लक्ष विचलित करण्यासाठी प्रशासनाने ‘ट्रेन महोत्सवा’चा घाट घातला. त्यामुळे आम्ही महोत्सवावर बहिष्कार टाकला, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून दादर-गोरखपूर ट्रेन सुरू करणे, उद्घोषणांमध्ये मराठीचा वापर टाळणे, त्यातच आता ‘डेक्कन क्वीन’च्या महोत्सवात मराठी भाषा डावलली. महाराष्ट्रातील गाडीच्या महोत्सवात जर मराठी वापरता येत नसेल आणि हिंदीतूनच महोत्सव साजरे करायचे असतील तर ते महाराष्ट्राबाहेर करावेत. दुर्दैवाने आता ‘भारतीय रेल्वे’ उरली नसून ती ‘उत्तर भारतीय रेल्वे’ बनली आहे. त्यानुसार रेल्वेचे नामांतरही करावे म्हणजे ‘मराठीत लिहा, मराठीत बोला’, असा आग्रह लोक धरणार नाहीत. – प्रा. दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
Comments are closed.