लवकरच 17 युद्धनौका, 9 पाणबुड्यांवरील निर्णय

भारतीय नौदलाचे वाढणार सामर्थ्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सशस्त्र दल सातत्याने स्वत:च्या सामर्थ्यात भर घालणारे पाऊल उचलत आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या खरेदीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याचनुसार भारतीय नौदलाला आणखी शक्तिशाली करण्याच्या तयारीला वेग देण्यात येणार आहे. 17 युद्धनौका आणि 9 पाणबुड्यांकरता लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

70 हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्ट 17-बी अंतर्गत 7 पुढील पिढीच्या फ्रिगेट तयार केल्या जाणार आहेत. याचबरोबर दोन बहुउद्देशीय जहाजांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू होईल. प्रोजेक्ट 75-आय अंतर्गत 6 आधुनिक पाणबुड्या निर्माण केल्या जाणार असून याकरता सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.

प्रोजेक्ट 75 (एड-ऑन) अंतर्गत 3 स्कॉर्पिन श्रेणीच्या पाणबुड्या निर्माण केल्या जातील आणि याकरता 36 हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. 9 नव्या पिढीच्या कॉर्वेट (छोट्या युद्धनौका)&निर्माण करण्याचा प्रकल्पही विचाराधीन असून याकरता सुमारे 36 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च 2 लाख 40 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल.

नौदलाची ही योजना स्वत:ची क्षमता अन् सामर्थ्य वाढविण्यावर आधारित आहे. जुन्या युद्धनौकांवर आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या युद्धनौकांनी बदलले जाणार आहे. 2035 पर्यंत 175 युद्धनौकांचा ताफा निर्माण करणे हे भारतीय नौदलाचे लक्ष्य आहे. भारतीय नौदल  सामर्थ्य वाढविण्यासाठी अनेक नव्या प्रकल्पांवर काम करत आहे.

Comments are closed.