राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर गप्प राहण्याचा निर्णय, शशिकांत शिंदे यांची भूमिका

अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला होता. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने अचानक या चर्चेला पूर्णविराम देत गप्प राहण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर काहीही भाष्य करणार नाही, अशी भूमिका प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज जाहीर केली.

दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणाच्या मागे लागलो आहे असं चित्र निर्माण केलं जात आहे. आमच्याकडून यासाठी गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर त्यांचीच चर्चा सुरू झाली. त्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. आम्ही एवढंच म्हणालो की, दादांची ही इच्छा होती ती पूर्ण करायची आहे, मात्र आता यावर बोलायचं नाही हे आम्ही ठरवलं आहे. राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने काम करण्याच्या भूमिकेत असल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरण झाल्यानंतर तुम्ही एनडीएसोबत जाणार होतात की अजित पवार एनडीएतून बाहेर पडणार होते? या प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले, ‘याबाबत काय निर्णय घ्यायचा हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होतं. त्यांच्या मनात काय होतं, माझ्या मनात काय होतं, हे आता गेल्यानंतर सांगणं योग्य नाही. इथून पुढे एनडीएसोबत जायचं की नाही, हा त्यांचा निर्णय असणार आहे. सुनेत्रा वहिनींचा तो अधिकार असणार आहे, असे शिंदे म्हणाले.

…तर मी शब्द मागे घेतो

अजितदादांची चूक झाली आहे असं मी म्हटलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. अजितदादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाबाबत दुरुस्ती करायची होती. शरद पवारांच्या भेटीतही अजितदादांनी कधीच नजरानजर केली नाही, असंही शिंदे म्हणाले.

या विषयात घाई करण्याची गरज नाही – भुजबळ

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यात. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना बोलावून या मुद्दय़ावर चर्चा करतील. शेवटी एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करूनच होईल. त्यावर एवढी घाई करण्याची गरज नाही, असे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Comments are closed.