विस्डेनमध्ये हिंदुस्थानचा दबदबा, दीप्ती शर्मा ‘सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर; ‘फाइव्ह क्रिकेटर्स ऑफ द इयर’मध्ये हिंदुस्थानचे चौघे

क्रिकेटमधील प्रतिष्ठित संदर्भग्रंथ ‘विस्डेन क्रिकेटर्स’ अल्मनॅकच्या ताज्या आवृत्तीत हिंदुस्थानच्या दीप्ती शर्मा हिला ‘सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर’चा सन्मान मिळाला आहे. पुरुष गटात हा मान ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मिळाला.

या प्रतिष्ठत अंकाची 163 वी आवृत्ती 15 एप्रिलला प्रकाशित होणार आहे. यंदा ‘फाइव्ह क्रिकेटर्स ऑफ द इयर’मध्ये चार हिंदुस्थानी खेळाडूंना स्थान मिळाले आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल, अष्टपैलू रवींद्र जाडेजा, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज  यांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध 2-2 ने बरोबरीत सुटलेल्या कसोटी मालिकेत या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.

गिलला विस्डेन ट्रॉफी

शुभमन गिलला उत्कृष्ट कामगिरीबद्दल विस्डेन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. एजबस्टन कसोटीत त्याने 430 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तर अभिषेक शर्माला वर्षातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्याने पॅलेंडर वर्षात 1000 धावा दोन धावा प्रतिचेंडूपेक्षा अधिक स्ट्राइक रेटने केल्या.

दीप्तीचा वर्ल्ड कपमधील मोलाचा वाटा

दीप्ती शर्मा हिने हिंदुस्थानच्या जगज्जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेत तिने 215 धावा आणि 22 विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 58 धावा आणि 5/39 अशी कामगिरी करत तिने संघाला विजय मिळवून दिला.

स्टार्कची दमदार कामगिरी

मिचेल स्टार्कने 2025 मध्ये शानदार कामगिरी करत 11 कसोटी सामन्यांत 55 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडीजविरुद्ध 6/9 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच ‘अॅशेस 2025-26’च्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत 18 विकेट्स घेत त्याने मालिकेत एकूण 31 विकेट घेतल्या. तसेच इंग्लंडच्या हसीब हमीद यालाही ‘फाइव्ह क्रिकेटर्स ऑफ द इयर’मध्ये स्थान मिळाले. त्याने नॉटिंगहॅमशायरला काऊंटी चॅम्पियनशिप जिंकून देताना 1258 धावा केल्या, ज्यामध्ये चार शतके आणि दोन द्विशतके होती.

1864 पासून प्रकाशन

‘विस्डेन क्रिकेटर्स’ अल्मनॅक हे जगप्रसिद्ध क्रीडा संदर्भ पुस्तक असून 1864 पासून दरवर्षी ब्रिटनमध्ये प्रकाशित केले जाते. याची स्थापना जॉन विस्डेन यांनी केली. क्रिकेटमधील अधिकृत नोंदी, स्कोअरकार्ड्स आणि ‘क्रिकेटर्स ऑफ द इयर’ पुरस्कार यांचा यात समावेश असतो.

Comments are closed.