Asia Cup Final: पाकिस्तानवर तिसऱ्यांदा शानदार विजय मिळवत टीम इंडियाने जिंकला आशिया कप! तिलक वर्मा विजयाचा हिरो
भारत विरुद्ध पाकिस्तान दुबईत खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 स्पर्धेच्या रोमांचक अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत 5 विकेट्सने विजय मिळवत 9वा आशिया कप जिंकला आहे (IND vs PAK Asia Cup Final). भारताने याआधी 8 वेळा विजेतेपद पटकावले होते आणि आजच्या विजयामुळे भारताने पुन्हा एकदा आशियाई क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हा विजय केवळ आणखी एक किताब नव्हे, तर भारतीय क्रिकेटच्या सुवर्णपानात नोंदला जाणारा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने खेळताना डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली होती. पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगला प्रहार करत 20 षटकांच्या आत पाकिस्तानला 146 धावांवर ऑल आऊट केले. कुलदीप 4, वरुण 2, अक्षर 2, जसप्रीत 2 विकेट्स घेत शानदार गोलंदाजी केली.
टीम इंडियाच्या डावाची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. सुरुवातीलाच अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव, शुबमन गिल हे खेळाडू बाद झाले. त्यानंतर तिलक वर्मा (Tilak Verma) आणि संजू सॅमसन यांनी डाव सांभाळला. त्यानंतर संजू देखील बाद झाला, व शिवम दुबे ने देखील 33 धावांची चांगली पारी खेळली. पण टीम इंडियाच्या विजयाचा हिरो खऱ्या अर्थाने तिलक वर्मा ठरला. त्याने सुरुवातीपासूनच सावधगिरीने खेळत 69 धावांची पारी खेळत 147 धावांचा यशस्वीपणे पाठलाग करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
Comments are closed.