मुसळधार पावसाने दिल्लीला झोडपले.

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेले दोन दिवस दिल्लीला परतीच्या मान्सूनच्या पावसाचा तडाखा बसला आहे. राष्ट्रीय राजधानीच्या क्षेत्रात यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. दिल्लीप्रमाणेच गुरुग्राम या दिल्लीनजीक असणाऱ्या शहरातही अतिवृष्टीचा कहर झाला आहे. शनिवारी सकाळपासूनच दिल्लीत जोरदार सरी बरसण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. राष्ट्रीय महामार्ग-48 वरही काही काळ पाणी आले होते. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ, धौला कुवा, महिपालपूर, संगमविहार, शाकारपूर, लक्ष्मीनगर, महरौली, बादरपूर मार्ग आदी स्थानांमध्येही पाणी साचले होते. आणखी दोन दिवस राजधानीत जोरदार वृष्टी होण्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. यंदाच्या मान्सून काळात दिल्लीत वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टच्या प्रथम सप्ताहातही दिल्लीत प्रचंड पाऊस झाला होता. कोणत्याही स्थितीशी दोन हात करण्यासाठी दिल्ली प्रशासनाने सज्जता ठेवली असून आपत्तीनिवारण पथकांना इशारा देण्यात आला आहे. शनिवारच्या पावसाने शहरात अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली. अचानक सरी कोसळल्याने नागरीकांचीही तारांबळ उडाली, अशी माहिती देण्यात आली आहे.

Comments are closed.