27 वर्षांआधी पाच वर्षांत 3 मुख्यमंत्री; दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण?, 3 नावं चर्चेत
दिल्ली बीजेपी मुख्यमंत्र्यांचा सामना दिल्ली निवडणुकीचा निकाल 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पराभव झाला आहे. नवी विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील आणि भाजपच्या परवेश वर्मा (Parvesh Verma) यांच्यात लढत झाली होती. यामध्ये परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याकडून दिल्ली (Delhi Election Result 2025) निसटल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिल्ली विधानसभा निवडणुकांत 60 च्या वर जागा जिंकणारी आम आदमी पार्टी सध्या 30 पेक्षा कमी जागी आघाडीवर आहे. तर भाजप 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. जर भाजपला बहुमत मिळाले तर ते 27 वर्षांनी पुन्हा सत्तेत येतील. यापूर्वी 1993 मध्ये भाजपने 49 जागा जिंकल्या होत्या आणि 5 वर्षांत 3 मुख्यमंत्री बनवले होते. यामध्ये मदनलाल खुराणा, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांचा समावेश होता. तिन्ही नेत्यांचे मुलं आणि मुली दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत. खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा मोती नगर येथून निवडणूक लढवत आहेत, तर साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा नवी दिल्ली येथून निवडणूक लढवत आहेत. तर सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज या नवी दिल्लीच्या खासदार आहेत.भाजपाला बहुमत मिळाल्यास दिल्लीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. सध्या राजकीय वर्तुळात परवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि दुष्यंत गौतम यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.
कोण आहे परवेश वर्मा?
आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपकडून परवेश वर्मा (Parvesh Verma) यांना उमेदवारी देण्यात आली होती. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. याशिवाय, प्रवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणातील जाट मतदारांना आकर्षित करणे भारतीय जनता पक्षाला सोपे जाईल. परवेश वर्मा म्हणाले की, दिल्लीतील जाट नेते, बंधू आणि भगिनी भाजपसोबत आहेत. दिल्लीचा विकास फक्त भाजपच करू शकते. जाट आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी राज्य सरकारला सभागृहातून कायदा करून केंद्राकडे पाठवावा लागेल, जे त्यांनी कधीही केले नाही. अरविंद केजरीवाल सतत खोटे बोलत आहेत, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे.
रमेश बिधुरी यांचं नावही मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर-
दिल्लीतील मुख्यमंत्रिपदासाठी रमेश बिधुरी यांचं नावही आघाडीवर आहे. गुज्जर समुदायातून आलेले रमेश बिधुरी यांचे त्यांच्या लोकांमध्ये एक विशेष स्थान आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपाने उमेदवारीही दिली होती. दिल्ली निवडणूक प्रचारादरम्यान, रमेश बिधुरी त्यांच्या विधानांमुळे खूप चर्चेत राहिले आहेत. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल बोलताना, जसे आम्ही ओखला आणि संगम विहारमधील रस्ते केले आहेत, तसेच आम्ही कालकाजीतील सर्व रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालासारखे गुळगुळीत करू, असं बिधुरी म्हणाले होते.
दुष्यंत गौतम यांचं नावही चर्चेत-
दिल्लीतील करोल बाग येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दुष्यंत कुमार गौतम हे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुष्यंत कुमार गौतम यांना दिल्लीचे मुख्यमंत्री करुन भाजपा सर्वांना धक्का देऊ शकतो. अनुसूचित जातीचे मतदार आणि बिहारमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन दुष्यंत कुमार गौतम यांना मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. अनुसूचित जातीचे मतदार आणि बिहारमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांना हे पद दिले जाऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भाजप दिल्लीतून बिहारला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते. याशिवाय, भाजपकडे अनुसूचित जातीचा मुख्यमंत्री नसल्याने, दुष्यंत कुमार गौतम यांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदी संधी दिली जाऊ शकते.
https://www.youtube.com/watch?v=jufsnbajzlw
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.