दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून भाजपने हटवले बाबासाहेब आंबेडकर व भगतसिंगाचे फोटो, लावला मोदींचा फोटो

दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने रेखा गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. रेखा गुप्ता यांनी नुकताच त्यांचा पदभार सांभाळला. दरम्यान दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी आणि अरविंद केजरीवाल यांनी रेखा गुप्ता यांच्या कार्यालयाचे फोटो शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहेत.

दिल्लीत आप सत्तेत असताना आतिशी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो होते. आता ते फोटो हटविण्यात आले असून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महात्मा गांधी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यावरून आतिशी व केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

”भाजपने आपला खरा दलित विरोधी व शीख विरोधी चेहरा दाखवला. दिल्ली विधानसभेतील मुख्यमंत्री कार्यालायातून बाबासाहेब आंबेडकर व शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे फोटो हटविण्यात आले आहेत”, असे आतिशी यांनी ट्विट केले आहे.

तर हे ट्विट रिट्विट करत अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपवर निशाणा साधला. ”दिल्लीतील नवीन भाजप सरकारने बाबासाहेबांचा फोटो हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. हे चुकीचे आहे. याने बाबासाहेबांच्या कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावल्या जातील. माझी भाजपला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा फोटो जरूर लावाला पण त्यासाठी बाबासाहेबांचा फोटो हटवू नये. त्यांचा फोटो तिथेच राहू द्यावा, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

Comments are closed.