समीर रिझवीचा ‘हिट’शो! दिल्लीने आयपीएलचा शेवट केला गोड, मात्र पंजाबची धाकधुक वाढली

पंजाब किंग्ज वि दिल्ली कॅपिटल आयपीएल 2025: गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर पंजाब किंग्जनेही प्लेऑफपूर्वी अव्वल स्थान मिळवण्याची संधी गमावली आहे. शनिवार 24 मे रोजी जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्सकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. समीर रिझवी आणि करुण नायर यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात 207 धावांचे मोठे लक्ष्य गाठले. यासह, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या हंगामाचा शेवट एका शानदार विजयाने केला. दिल्ली एकूण 15 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली.

या सामन्यात पंजाबने पाहिली फलंदाजी केली, पण फॉर्ममध्ये असलेला फलंदाज प्रियांश आर्य काही खास कामगिरी करू शकला नाही. तो फक्त 6 धावा करून आऊट झाला. मुस्तफिजूर रहमानने त्याची विकेट घेतली. पण, प्रभसिमरन सिंग (28) आणि जोश इंग्लिश (32) यांनी स्फोटक फलंदाजी केली आणि दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांच्या विकेट विप्रज निगमने घेतल्या. एकूण 77 धावांपर्यंत पंजाबने आपल्या तीन फलंदाजांच्या विकेट गमावल्या होत्या.

श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची खेळी…

येथून कर्णधार श्रेयस अय्यरने एका टोकाची जबाबदारी घेतली, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांची साथ मिळाली नाही. दोन्ही फलंदाजांनी अनुक्रमे 16 आणि 11 धावा केल्या. आपल्या शानदार खेळीदरम्यान, अय्यरने 34 चेंडूत 53 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्या बाद झाल्यानंतर असे वाटत होते की, पंजाबचा संघ कदाचित 200 धावांचा टप्पा ओलांडू शकणार नाही, परंतु मार्कस स्टोइनिसने हे होऊ दिले नाही.

मार्कस स्टोइनिस नावाचं वादळ

या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूला 18 व्या षटकात जीवनदान मिळाले, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याने शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. ज्यामुळे पंजाब संघाला पूर्ण षटके खेळून 8 विकेट्स गमावून 206 धावा करता आल्या. दिल्लीकडून रेहमानने सर्वाधिक 3 बळी घेतले.

समीर रिझवी आणि करुण नायर यांचा ‘हिट’शो!

207 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. केएल राहुल आणि फाफ डु प्लेसिस यांनी आक्रमक सुरुवात केली. पण दिल्लीला पहिला धक्का सहाव्या षटकात बसला, जेव्हा केएल राहुलची विकेट पडली. केएल राहुलने 35 धावा केल्या. यानंतर, सातव्या षटकात फाफची विकेटही पडली. फाफने 23 धावा केल्या, त्याच वेळी अटलनेही चांगली फलंदाजी केली आणि 22 धावा केल्या, पण 11 व्या षटकात त्याची विकेट पडली. पण यानंतर समीर रिझवी आणि करुण नायर यांच्यात चांगली भागीदारी झाली. पण 15 व्या षटकात करुण नायरची विकेट पडली. नायरने 27 चेंडूत 44 धावा केल्या.  नायर आऊट झाला तेव्हा दिल्लीला विजयासाठी 5 षटकांत 52 धावांची आवश्यकता होती.

पण समीर रिझवी एका टोकालाच उभा राहिला. त्याच वेळी, स्टब्सने त्याला खूप चांगले साथ दिली. दिल्लीला शेवटच्या दोन षटकांत जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता होती. दरम्यान, समीर रिझवीने आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने फक्त 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता होती. अखेर दिल्लीने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.

अधिक पाहा..

Comments are closed.