दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना झेड सुरक्षा मिळते
20+ सशस्त्र सीआरपीएफ जवान 24 तास तैनात राहणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्र सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा प्रदान केली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत 22 ते 25 सशस्त्र कर्मचारी 24 तास तैनात असतील. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता निमलष्करी दलातील व्हीआयपी सुरक्षा पथक त्यांची वैयक्तिक सुरक्षा आणि त्यांच्या अधिकृत निवासस्थानाचे रक्षण करणार आहे. हा गट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सोनिया-राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेतही तैनात आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवार, 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8.15 वाजता जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने हल्ला केला होता.
आरोपी राजेशभाई खिमजी असे हल्लेखोराचे नाव असून तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे. त्याला ताबडतोब अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीला बुधवारी रात्री नैर्त्रुत्य दिल्लीतील द्वारका येथील दंडाधिकाऱ्यांच्या घरी हजर करण्यात आल्यानंतर त्याला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. राजेशविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातमध्येही राजेशविरुद्ध चाकूने मारहाणीसह पाच गुन्हे आधीच दाखल आहेत. मात्र, अटकेदरम्यान त्याच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नाही. सध्या इंटेलिजेंस ब्युरो आणि दिल्ली पोलिसांचे विशेष सेल त्याची चौकशी करत आहेत. तक्रारदार म्हणून जनसुनावणीला पोहोचलेल्या राजेश याने मुख्यमंत्र्यांना कागदपत्रे देताना हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या मुख्यमंत्री रेखा यांच्या हाताला, खांद्यावर आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत. सध्या त्या घरातूनच काम करत आहेत.
Comments are closed.