चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादवला मोठा दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून शिक्षेला अंतरिम स्थगिती
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असून राजपाल यादव यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने राजपाल यादवला एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तेवढ्याच रकमेची हमी सादर करण्याच्या अटीवर ही सवलत दिली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रामुख्याने एका महत्त्वाच्या बाबीची नोंद घेतली. राजपाल यादवने संबंधित वादीच्या बँक खात्यात आधीच 1.5 कोटी रुपये जमा केले आहेत, ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, हा दिलासा केवळ अंतरिम स्वरूपाचा असून या प्रकरणाचा अंतिम निर्णय पुढील सुनावणीदरम्यान घेतला जाईल.
हे संपूर्ण प्रकरण चेक बाऊन्सशी संबंधित आहे, ज्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने राजपाल यादवला दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात अभिनेत्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले होते. न्यायालयाच्या या आदेशामुळे राजपाल यादवला अटींशर्थी ठेवत तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील सुनावणी सुरूच राहणार आहे.
Comments are closed.