दिल्ली रेड झोनमध्ये, प्रदूषणाविरोधात निदर्शने
अनेक लोकांना पोलिसांनी घेतले ताब्यात : निदर्शकांना राजकीय पक्षांचा पाठिंबा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. बहुतांश भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 400 पेक्षाही अधिक झाला असून हे प्रमाण ‘गंभीर’ श्रेणीत मोडणारे आहे. यामुळे लोकांना श्वसनविषयक आजार होऊ लागले असून प्रदूषणामुळे आरोग्य संकट तीव्र होत चालले आहे. प्रदूषणाच्या विरोधात रविवारी संध्याकाळी लोकांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली आहेत. या निदर्शनांमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस समवेत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही सामील झाले.
लोकांच्या जमावाने इंडिया गेटच्या दिशेने मोर्चा काढत दिल्लीत वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी ठोस अणि प्रभावी धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
निदर्शनांची नव्हती अनुमती
दिल्ली पोलिसांनी निदर्शकांना रोखत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंडिया गेट येथे निदर्शने करता येणार असल्याचे सांगितले. राजधानीत निदर्शनांसाठी केवळ जंतर मंतरलाच अधिकृत स्थान म्हणून निश्चित करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याचमुळे पोलिसांनी लोकांना जंतर-मंतरच्या दिशेने जाण्यास सांगत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक निदर्शकांना ताब्यात घेतले आहे.
स्थायी उपाययोजनांची मागणी
राजधानीची हवा आता अत्यंत धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने वाढत असल्याने लोकांना श्वास घेणेही अवघड ठरत आहे. सरकार लोकांना शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करू देत नसून त्यांना जबरदस्तीने हटविले जात असल्याचा दावा एका निदर्शकाने केला. सामान्य लोक प्रदूषणामुळे आजारी पडून मृत्युमुखी पडत आहेत. परंतु सरकार अद्याप देखील कुठलेच ठोस धोरण तयार करत नसल्याची स्थिती आहे. सरकार प्रदूषणाची खरी आकडेवारी लपवत असून देखाव्यासाठी केवळ डाटा सेंटर्सवर पाण्याचा शिडकावा करण्यासारखी पावले उचलत आहे. क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोगही निष्प्रभ ठरला असून हा काही स्थायी तोडगा नसल्याचे म्हणत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘आप’चा भाजपवर आरोप
दिल्लीत हवा प्रदूषणावरून सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज हे देखील इंडिया गेट येथे पोहोचले. प्रदूषणाची समस्या दिल्लीत दीर्घकाळापासून आहे, परंतु पहिल्यांदाच बुद्धिवंत वर्ग अशाप्रकारे रस्त्यांवर उतरून विरोध दर्शवत असल्याचा दावा भारद्वाज यांनी केला आहे. ही स्थिती सरकार आणि जनतेदरम्यान विश्वासाची कमतरता दर्शविते. जेव्हा प्रदूषणाचा स्तर अत्यंत वाढतो, तेव्हा सरकार जाणूनबुजून हवा गुणवत्ता डाटा लपविते, केंद्र सरकार उघडपणे डाटामध्ये फेरफार करत असून वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ नये म्हणून धडपड करत असल्याचा आरोप आप नेत्याने केला आहे.
Comments are closed.