दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात
ग्रॅप-3 नियम लागू : कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची अनुमती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत प्रदुषणाची धास्ती दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी येथील हवा प्रदूषण पातळी 400 एक्यूआयच्या पुढे पोहोचल्यानंतर वाढत्या प्रदुषणाला प्रतिसाद म्हणून सरकारने एक अॅडव्हायझरी जारी केली. आता या अॅडव्हायझरीनुसार ‘ग्रॅप-3’चे नियम लागू करण्यात आले असून खासगी संस्थांना घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या (सीएक्यूएम) निर्देशांनुसार राजधानीतील खासगी कार्यालयांसाठी एक नवीन नियमावली जारी केली आहे.
सरकारच्या नव्या सल्ल्यानुसार आता खासगी कार्यालये त्यांच्या 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करतील, तर उर्वरित कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करू शकतील. प्रदूषण परिस्थिती संतुलित करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्लीप्रमाणेच उत्तर प्रदेश सरकारनेही एक मोठा निर्णय घेतला आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्ये डिझेल ऑटोरिक्षा चालविण्यावर तात्काळ बंदी घातली आहे.
राजधानी दिल्लीसह आजुबाजुच्या राज्यांमध्ये सध्या प्रदुषणासह थंडी व धुक्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. प्रदुषणाची ही धोकादायक पातळी आरोग्यासाठी धोकादायक आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सतत वाढणाऱ्या प्रदुषणाचा लोकांच्या आरोग्यावर स्पष्ट परिणाम होत आहे. रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जास्त एक्यूआय पातळीमुळे दमा, ब्राँकायटिस, फुफ्फुसांचे संसर्गजन्य आजार आणि हृदयरोगाचा धोका वाढत असल्याने लोकांना दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गेल्या 15 दिवसांपासून मध्यप्रदेशात तीव्र थंडी जाणवत आहे. गेल्या 24 तासांत, भोपाळ आणि इंदूरसह 12 शहरांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. राजगडमध्ये सर्वात कमी 7.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. याचदरम्यान जबलपूर दाट धुक्याने वेढले गेले होते. शनिवारी इंदूर, भोपाळ, राजगड, शाजापूर आणि सेहोर येथे थंडीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथे तापमान उणे 6 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. सकाळी मैदानी भागात धुके पसरल्याचेही दिसून आले. हवामानशास्त्रज्ञांच्या मते पुढील काही दिवस राज्यात हवामान असेच राहण्याची शक्यता आहे.
Comments are closed.