सात तासांचा प्रवास आणि अचानक माघारी फिरले विमान, दिल्ली – मँचेस्टर विमानाचा यू-टर्न
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यांनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती स्फोटक आहे. या भागातून जाणारा हवाई मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. बऱ्याच काळानंतर दिल्लीहून मँचेस्टर येथे निघालेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाला प्रवास सुरू असतानाच माघारी फिरावे लागले आहे. तब्बल सात तासांचा प्रवास करून हे विमान पुन्हा दिल्लीत परतत आहे. पुन्हा एकदा मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागला आहे.
‘फ्लाइटराडर २४’ (Flightradar24) या विमान ट्रॅकिंग सेवेनुसार, ‘नोर्स’द्वारे (Norse) चालवले जाणारे इंडिगोचे ‘६ई ३३’ (6E33) हे विमान इथिओपिया आणि एरिट्रियाच्या सीमेजवळून ‘यू-टर्न’ घेऊन आता दिल्लीकडे परतत आहे.
हे विमान सोमवारी पहाटे राजधानी दिल्लीतून ब्रिटनमधील मँचेस्टर शहरासाठी रवाना झाले होते. २६ फेब्रुवारीनंतरची इंडिगोची ही पहिलीच दिल्ली-मँचेस्टर विमान सेवा सुरू झाली होती. दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर हा लांब पल्ल्याचा मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला होता आणि सामान्य परिस्थितीत हे अंतर कापण्यासाठी साधारण ११ तास लागणे अपेक्षित होते.
विमान ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून येते की, पश्चिम आशियातील सक्रिय युद्धक्षेत्र टाळण्यासाठी आखलेल्या मार्गावरून प्रवास करूनही, सुमारे सात तासांच्या उड्डाणानंतर विमानाला परतावे लागले.
‘फ्लाइटराडर २४’ नुसार, इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील बहुतांश हवाई क्षेत्र टाळण्यासाठी या विमानाने ‘गल्फ ऑफ एडन’ आणि आफ्रिकेच्या काही भागातून जाणाऱ्या एका वेगळ्या मार्गाची निवड केली होती.
युद्धक्षेत्रांना पूर्णपणे वळसा घातलेला असतानाही हे विमान वळवावे लागले, यावरून पश्चिम आशियातील काही भागांमधील हवाई निर्बंध किती वेगाने बदलत आहेत, हे अगदी ठळकपणे दिसत आहे.
या संदर्भात माहिती देताना इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, शेवटच्या क्षणी हवाई क्षेत्रावर निर्बंध लादण्यात आल्याने एअरलाईन्सला हा निर्णय घ्यावा लागला.
प्रवक्त्याने स्पष्ट केले की, ‘मध्यपूर्वेतील आणि आसपासच्या विकसित होत असलेल्या परिस्थितीमुळे, आमच्या काही विमानांना लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो किंवा विमाने वळवावी लागू शकतात. पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीमुळे हवाई क्षेत्रावर अचानक निर्बंध आल्याने, दिल्लीहून मँचेस्टरला जाणारे आमचे विमान ‘६ई ०३३’ पुन्हा मूळ स्थानी परतत आहे’.
विमानाचा प्रवास पुन्हा सुरू करता येईल का, यावर सध्या प्राधिकरणांशी चर्चा सुरू असल्याचे एअरलाईनने म्हटले आहे. ‘आम्ही संबंधित प्राधिकरणांसोबत प्रवास पुन्हा सुरू करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहोत. नेहमीप्रमाणेच आमचे ग्राहक, कर्मचारी आणि विमानाची सुरक्षा आणि सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,’ असेही प्रवक्त्याने पुढे सांगितले.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल या दोन मित्रराष्ट्रांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्ध सुरू झाले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इराण सातत्याने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करत आहे. प्रत्युत्तरात हे दोन मित्रराष्ट्र देखील इराणी लक्ष्यांवर हल्ले करत आहेत.
जोपर्यंत ही परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. पर्यटन क्षेत्र देखील यामुळे विस्कळीत झालं असून लवकरच परिस्थितीत बदल झाला नाही तर आणखी अडचणी वाढणार आहेत.
Comments are closed.