दिल्ली पोलिसांनी पेंग्विन इंडियाला नोटीस बजावली आहे

नरवणेंच्या पुस्तकावरून वादंग : राहुल गांधींच्या दाव्यानंतर पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माजी सैन्यप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांचे पुस्तक ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ लीक झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रकाशक पेंग्विन रँडम हाउस  इंडियाला नोटीस जारी केली आहे. यापूर्वी पोलिसांनी पुस्तकाची एक प्री-प्रिंट प्रत सार्वजनिक स्वरुपात प्रसारित केली जात असल्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील दाव्याची दखल घेतली होती.

नोटीसच्या माध्यमातून अप्रकाशित पुस्तकाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे मागण्यात आली आहेत. तसेच प्रकाशक पेंग्विन इंडियाला तपासात सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अधिकृत गोपनीयता अधिनियम आणि गुन्हेगारी कटाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. विना अनुमती पुस्तकाचा मजकूर उघड कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. राहुल गांधींकडे कंटेंट असण्याची बाबही तपासाच्या कक्षेत आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे.

नरवणे यांचे पुस्तक प्रकाशित झालेले नाही, तसेच त्याची विक्री करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण याप्रकरणी पेंग्विन इंडियाने दिले आहे. पुस्तकाची प्रत किंवा पीडीएफ फॉर्ममध्ये शेअर करणे त्याच्या कॉपीराइटचे उल्लंघन असल्याचा इशाराही कंपनीने दिला आहे. फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाच्या प्रकाशनाचे अधिकार आमच्याकडे आहेत. पुस्तकाचे प्रकाशन आतापर्यंत झालेले नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो असे पेंग्विन इंडियाने सांगितले आहे. तर स्वत: नरवणे यांनीही पेंग्विनच्या या दाव्याची पुष्टी दिली होती.

पुस्तकावरून इतकी चर्चा का?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात भाग घेत स्वत:च्या भाषणात पुस्तकाच्या काही हिस्स्यांचा उल्लेख केला होता, याला त्यांनी ‘प्रिंटपूर्वीचे’ स्वरुप ठरविले होते. त्यांच्या या उल्लेखाला सत्तारुढ पक्षाच्या खासदारांनी विरोध केला होता, यामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले होते.

2023 च्या पोस्टचा उल्लेख

राहुल गांधींनी पुस्तकाशी संबंधित नरवणे यांच्या 2023 च्या एका पोस्टचही उल्लेख केला होता. नरवणे यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी ट्विट करत ‘हॅलो मित्रांनो, माझे पुस्तक आता उपलब्ध आहे, केवळ लिंकला फॉलो करा, हॅपी रीडिंग, जय हिंद’ असे म्हटले होते.

नेमकं कोण खोटं बोलतयं

या पुस्तकाप्रकरणी एक तर प्रकाशक खोटं बोलतोय किंवा नरवणे. माजी सैन्यप्रमुख जनरल नरवणे खोटं बोलतील असे मला वाटत नाही. पुस्तकात सरकार आणि पंतप्रधानांसाठी काही असहज गोष्टी लिहिल गेल्या आहेत. मी पेंग्विनऐवजी नरवणे यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतो असे राहुल गांधी यांनी नमूद केले होते.

कर्मचाऱ्यांवर संशय

पुस्तकाच्या कंटेंटची माहिती माजी सैन्यप्रमुख नरवणे यांच्याव्यतिरिक्त ‘पेंग्विन रँडम हाउस’ला होती. नरवणे यांनी पुस्तक प्रकाशनासाठी कंटेंट पेंग्विन  रँडम हाउसला दिल्यावर तेथे कुणाच्या तरी हाती कंटेंट लागला असावा असा संशय एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. पेंग्विन रँडम हाउसमध्ये मोठ्या संख्येत कर्मचारी काम करतात. यातील एकाने जाणूनबुजून कंटेंट लीक केला असण्याची शक्यता आहे. याचमुळे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हेगारी कटाचे कलम जोडले आहे.

Comments are closed.