दिल्ली हादरली! सत्य निकेतनमध्ये पाच मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर – TMarathiNews
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी (6 सप्टेंबर) दुपारी पाच मजली इमारत कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या इमारतीत मुलांचे पीजी सुरू असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, दुपारी सुमारे 1.30 वाजता नानकपुरा गुरुद्वाराजवळ ही दुर्घटना घडली. इमारत कोसळल्याची माहिती पोलिसांना दुपारी 1.34 वाजता मिळाली. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
इमारतीचा मोठा भाग कोसळल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात ढिगारा जमा झाला आहे. बचाव पथकांकडून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत काही जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे बचावकार्य अधिक काळजीपूर्वक सुरू ठेवण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून इमारतीच्या दुर्घटनेमागील कारणांचा तपास केला जात आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेची व्याप्ती आणि जीवितहानीचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.