‘नवी दिल्ली’ मतदारसंघात कोण वरचढ? अरविंद केजरीवाल जिंकणार का? राजधानीला मुख्यमंत्री देणाऱ्या मत

दिल्ली विधी सभा 2025: नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे, आणि यावेळी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री देणारा मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात, यंदाच्या निवडणुकीतही कडवी लढत पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपकडून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री दिवंगत साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र प्रवेश वर्मा, आणि काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित हे निवडणूक लढवत आहेत.

मुख्यमंत्री देणारा मतदारसंघ म्हणून नवी दिल्ली मतदारसंघाची ओळख

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री देणारा मतदारसंघ मानला जातो, कारण यापूर्वी येथे भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. 1993 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कीर्ती आझाद यांनी विजय मिळवून दिल्लीमध्ये भाजपचे सरकार स्थापन केले. त्यानंतरच्या 1998, 2003 आणि 2008 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेत्या श्रीमती शीला दीक्षित यांनी विजय मिळवून दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सलग तीन वेळा भूषवले. शीला दीक्षित यांची सत्ता अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डळमळली, आणि 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी याच नवी दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसला हरवून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा मुकुट मिळवला.
अरविंद केजरीवाल यांनी 2013 मध्ये मिळवलेला विजय हा दिल्लीच्या राजकारणातील मोठा टप्पा ठरला. आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून केजरीवाल यांनी भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेतली आणि आपला पक्ष दिल्लीतील सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणून प्रस्थापित केला. 2013 नंतर 2015 आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून विजय मिळवला आणि पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे केजरीवाल यांचा या मतदारसंघातील प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती

सध्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील राजकीय आणि जातीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल दिसत आहेत. 2020 मध्ये या मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 46,000 होती, जी आता वाढून 1,90,000 झाली आहे. मतदारसंघात मुख्यत्वे वाल्मिकी समाज आणि धोबी समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. याशिवाय शासकीय कार्यालये, केंद्रीय मंत्री, आणि वरिष्ठ अधिकारी यांची निवासस्थानेही या मतदारसंघात आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचारी वर्गाचे मत या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

जातीय समिकरणे आणि कल

वाल्मिकी समाजाने मागील तीन निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांना मोठा पाठिंबा दिला होता. मात्र, या समाजाला दिलेले झोपडपट्टी पुनर्वसनाचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे समाजात नाराजी दिसून येते. भाजपने याच नाराजीचा फायदा घेत, वाल्मिकी समाजातील नेत्यांची भेट घेऊन त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवेश वर्मा यांनी देखील या समाजाच्या वस्त्यांमध्ये वैयक्तिक निधीने काही विकासकामे मार्गी लावली आहेत, त्यामुळे वाल्मिकी समाजाचे काही मते भाजपकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र, केजरीवाल यांनीही नाराजी दूर करण्यासाठी वाल्मिकी समाजाच्या नेत्यांना पक्षात सामील करून घेत, त्यांना विविध पदांवर नियुक्त करून मतदारसंघातील त्यांचा आधार मजबूत ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत.

धोबी समाज हा देखील या मतदारसंघातील महत्त्वाचा घटक आहे. 20,000 हून अधिक मतदार असलेल्या या समाजाने मागील निवडणुकांमध्ये केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. यावेळीही अरविंद केजरीवाल यांनी धोबी समाजासाठी “धोबी समाज कल्याण बोर्ड” स्थापण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे या समाजाचा पाठिंबा पुन्हा मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली मतदारसंघात मुस्लिम समाज हा पारंपरिकपणे काँग्रेसचा मतदार होता. मात्र, गेल्या तीन निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदार आम आदमी पक्षाच्या बाजूने उभे राहिले आहेत. भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आल्यामुळे, सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाज काँग्रेसकडे वळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हा मतदारवर्ग पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या बाजूने राहील असे दिसत आहे.
पंजाबी मतदारही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वी काँग्रेस आणि भाजप यांच्यात विभागलेला हा मतदारवर्ग, काँग्रेसच्या प्रभावाच्या घटत्या काळात आम आदमी पक्षाच्या बाजूने वळलेला दिसतो.

उच्चवर्गीय मतदार आणि कर्मचारी वर्ग

उच्च मध्यमवर्गीय आणि वरीष्ठ सरकारी अधिकारी वर्गातील मतदार हे भाजपच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. भाजपने सरकारी कर्मचारी वर्गाला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अरविंद केजरीवाल हे स्वतः माजी सनदी अधिकारी असल्याने त्यांना या वर्गाची सहानुभूती मिळत असल्याचे दिसते. तसेच, उच्चवर्गीय मतदार हा बहुतेकदा विकासाच्या मुद्द्यांवर आधारित मतदान करतो, त्यामुळे या वर्गाचे मते भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात विभागली जातील असे अंदाज आहेत.

भाजपची रणनिती

प्रवेश वर्मा यांना त्यांच्या वडिलांची प्रतिमा आणि भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा फायदा मिळत असला तरी त्यांची स्वतःची राजकीय लोकप्रियता कमी असल्यामुळे निवडणूक जिंकणे कठीण होईल. भाजपने मतदार नोंदणीवर भर दिला असला, तरी त्याचा प्रत्यक्ष मतांवर कितपत परिणाम होईल हे स्पष्ट नाही. शिवाय, हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दा आणि भाजपचे बूथ स्तरावर काम कितपत यशस्वी ठरेल हेही पाहावे लागेल.

काँग्रेसची बाजू कमकुवत असल्याचे चित्र

दुसरीकडे, काँग्रेसकडून संदीप दीक्षित हे उमेदवार असले तरी त्यांची संघटन क्षमता आणि स्थानिक पातळीवरचा स्वीकार कमकुवत असल्याने काँग्रेसला यंदाही फारसा फायदा होईल असे वाटत नाही. त्यामुळे, या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अजूनही दुबळी दिसत आहे.

केजरीवाल यांच्या विजयाची शक्यता

सध्याच्या परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. त्यांच्या कार्यकाळातील अनेक निर्णय, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, आणि जनतेच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी केलेले काम यामुळे त्यांच्याकडे एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. शिवाय, केंद्र सरकारने केजरीवाल यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न केल्यामुळे जनतेची सहानुभूतीही त्यांच्या बाजूने आहे.
या सर्व घटकांचा विचार करता, नवी दिल्ली मतदारसंघातील निवडणुकीत अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा विजयी होण्याची शक्यता दिसून येत आहे.

किरण येवले आणि अनिस नवरंगी (व्यवस्थापक, रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स)

(नोट – रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स म्हणजेच ‘रुद्र’ ही संस्था एग्झीट पोल, सर्वेक्षण आणि पॉलिटीकल ग्राउंड इंटिलीजन्स करते. संस्थेने नुकताच नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचा ग्राउंडवर जाऊन आढावा घेतला. यामध्ये राजकीय जाणकार, राजकीय नेते आणि सामान्य मतदारांशी संवाद साधण्यात आला. वरील लेखातील मतं ही वैयक्तिक स्वरुपाची आहेत. त्याच्याशी ‘एबीपी माझा’ सहमत असेलच असे नाही.)

अधिक पाहा..

Comments are closed.