ढाक्यातील हिंदुस्थानी उच्चायुक्तांना धमक्या; दिल्लीत बांग्लादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून घेतले
ढाक्यातील हिंदुस्थानच्या दूतावासाच्या सुरक्षेबाबत वाढत चाललेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने बुधवारी दिल्लीत बांग्लादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून घेतले. बांग्लादेशची राजधानी ढाका येथे हिंदुस्थानी मिशनच्या बाहेर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने बांग्लादेशचे हिंदुस्थानातील उच्चायुक्त एम. रियाज हमीदुल्लाह यांना बोलावून घेत ढाक्यातील हिंदुस्थानी मिशनच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी दूतावासाच्या सुरक्षेबाबत हिंदुस्थान सरकारची चिंता स्पष्टपणे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ढाक्यातील घडामोडी आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेबाबत बांग्लादेश सरकारने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी अपेक्षा हिंदुस्थानने व्यक्त केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाक्यातील हिंदुस्थान मिशनच्या बाहेर मागील काही दिवसांपासून सातत्याने निदर्शने होत आहेत. या आंदोलनांमुळे दूतावासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने औपचारिकरीत्या बांग्लादेश सरकारकडे परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, बांग्लादेशातील नॅशनल सिटिजन्स पार्टी (NCP)चे नेते हसनत अब्दुल्लाह यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढला आहे. एका सार्वजनिक भाषणात हसनत अब्दुल्लाह यांनी हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांना, म्हणजेच ‘सेव्हन सिस्टर्स’ला वेगळे पाडण्याबाबत तसेच विभाजनवादी घटकांना आश्रय देण्याबाबत धमकीसदृश विधान केले होते. हसनत अब्दुल्लाह हे त्यांच्या कट्टर हिंदुस्थानविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात.
महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण घडामोड बांग्लादेशच्या विजय दिनानंतरच्या दुसऱ्याच दिवशी घडली आहे. विजय दिन हा 1971 च्या युद्धात हिंदुस्थानच्या मदतीने बांग्लादेशला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. विजय दिनाच्या एक दिवस आधी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांग्लादेशला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत बांग्लादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन, अंतरिम सरकार आणि बांग्लादेशच्या जनतेला विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
Comments are closed.