अबकारी शुल्कात घट तरी, पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे; ग्राहकांना फायदा नाहीच
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात जाहीर केली असली, तरी त्याचा तात्काळ फायदा ग्राहकांना मिळण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये इंधनाचे किरकोळ दर अद्यापही बदललेले नाहीत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
उद्योगातील आकडेवारीनुसार, केंद्राने अबकारी शुल्कात कपात केली असतानाच पेट्रोलचा बेस डेपो दर प्रति लिटर 10 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कर कपात केली असली तरी त्याचा फायदा ग्राहकांना मिळणार नाहिये. परिणामी, मुंबईत पेट्रोलचा दर सुमारे 103.45 प्रति लिटर इतकाच कायम आहे.
तज्ज्ञांच्या मते, अबकारी शुल्काची रचना चार घटकांमध्ये विभागलेली असून यातील केवळ “स्पेशल अॅडिशनल एक्साइज ड्युटी”मध्येच कपात करण्यात आली आहे. तर बेसिक एक्साइज ड्युटी, कृषी पायाभूत सुविधा व विकास सेस आणि रोड व इन्फ्रास्ट्रक्चर सेस हे तीन घटक पूर्ववत ठेवण्यात आले आहेत.
27 मार्चपासून लागू झालेल्या बदलांनुसार, पेट्रोलवरील एकूण अबकारी शुल्क 21.90 वरून 11.90 प्रति लिटर इतके झाले असून डिझेलवरील शुल्क 17.80 वरून 7.80 प्रति लिटरपर्यंत खाली आले आहे. मात्र, डिझेलवरील अबकारी शुल्क शून्यावर आले असल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे, कारण इतर कर घटक अद्याप लागूच आहेत.
या संदर्भात शहरातील पेट्रोलियम विक्रेते व किंमत तज्ज्ञ केदार चांडक
यांनी सांगितले की, “ही कपात प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भार तेल कंपन्यांवर कमी करण्यासाठी करण्यात आलेली अंतर्गत बदल आहे. याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची कोणतीही खात्री नाही.”
दरम्यान, केंद्राच्या करांमध्ये कपात झाली असली तरी राज्य सरकारचे व्हॅट आणि इतर सेस कायम आहेत. मुंबईत हे कर सध्या 23.98 प्रति लिटर इतकेच असून डीलर कमिशनही 4.01 प्रति लिटर इतके स्थिर आहे. त्यामुळे एकूण करभार 45.88 वरून 35.88 प्रति लिटरपर्यंत कमी झाला असला तरी किरकोळ दरावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
Comments are closed.