आधार असूनही 43 हजार विद्यार्थी ‘निराधार’; प्रमाणिकरणाअभावी संचमान्यता अडचणीत

शालेय शिक्षण विभागाने ‘स्टुडंट्स पोर्टल’वर विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र, ही मुदत उलटूनही विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण अद्याप झालेले नाही. विविध तांत्रिक अडचणी आणि आधार कार्डातील तपशील जुळत नसल्यामुळे शहरातील ४३ हजार ३६८ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे. काही अंशतः अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांनी अद्यापि विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण केले नसल्याची माहिती उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. परिणामी, अशा शाळांची संचमान्यता कशी होणार, हा प्रश्न आहे.
शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभज्या विद्यार्थ्यांना दिला जातो, त्यांचे आधार कार्ड अद्ययावत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी निर्धारित २३ जुलैपर्यंतच्या अंतिम मुदतीमध्ये महापालिका हद्दीतील शाळांमधील भोसरी विभागातील २१ हजार ४२५ आणि आकुर्डी विभागातील २१ हजार ९४३ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम झाले आहे. पिंपरी विभागातील ७० टक्के आणि आकुर्डी विभागातील ४४ टक्के शाळांकडून आधार प्रमाणिकरण झाले आहे. विविध तांत्रिक अडचणी आणि आधार कार्डातील तपशील जुळत नसल्याने ४३ हजार ३६८ विद्याथ्यर्थ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे. काही अंशतः अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांनी अद्यापि विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण केले नसल्याची माहिती उपलब्ध आकडेवारी दिसून येत आहे. आधार कार्ड अद्ययावत न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे अनुदान मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अनुदानाच्या कक्षेत येणाऱ्या शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी संचमान्यता गरजेची आहे. त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू केली आहे. अनुदानास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शालेय पोषण आहाराबरोबर मोफत पाठ्यपुस्तके व अन्य सरकारी योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळे आधार कार्ड २३ जुलैपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक होते. त्यानंतरच विद्यार्थ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. एनआयसी, पुणे सरल प्रणालीतील ‘स्टुडंट पोर्टल’वर नोंदविल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार अद्ययावतीकरणाचे काम वेळोवेळी मुदतवाढ देऊनही पूर्ण झालेले नाही.
विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करताना अनेक अडचणी येत आहेत. दिवसातून दोन ते तीनच विद्यार्थ्यांची आधार कार्ड अद्ययावत होत आहेत. विविध तांत्रिक अडचणींमुळे आधार कार्डातील तपशील जुळत नव्हते. त्यामुळे शिक्षक, पालकांसमोरील अडचणींचा डोंगर असताना अनेक शाळांनी प्रयत्न केले. स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांना आधार प्रमाणिकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत.”
– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग, महापालिका.
तांत्रिक अडचणींमुळे अडथळे
अनेक पालकांमध्ये आधारविषयी जागृतीचा अभाव दिसून येतो. त्याचबरोबर बऱ्याच पाल्यांचे आधार कार्डच काढणे बाकी आहे. काही मुले स्थलांतरित झाली आहेत. संकेतस्थळ वारंवार ‘हँग’ होण्याचा प्रकार घडत असल्याने प्रमाणिकरणाच्या प्रक्रियेत अडथळे येतात. अनेक विद्यार्थ्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये अडचण आहे. या अनेक बाबींमुळे शिक्षकांपर्यंत अद्ययावत माहिती येण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
Comments are closed.