दिल्लीविरुद्ध 1 धावेने विजय मिळवल्यानंतरही जीटीचा कॅप्टन गिलला सुनावली शिक्षा, नेमके काय चुकले?
आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिलला बीसीसीआयच्या शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. त्याला स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएल २०२२ चा विजेता संघ गुजरातने आचारसंहितेच्या नियम २.२२ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आणि चालू हंगामातील त्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याला आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. ओव्हर-रेटच्या मर्यादेचे पालन न केल्याने शिक्षा सुनावलेला गुजरात हा या हंगामातील दुसरा संघ आहे. याआधी पंजाब किंग्जच्या कर्णधारा दोन वेळा दंड ठोठावला आहे.
जुन्या नियमानुसार, तिसऱ्यांदा हा गुन्हा केल्यास अय्यरवर एका सामन्याची बंदी घातली गेली असती, मात्र चालू हंगामात सुधारित आयपीएल आचारसंहितेनुसार आता तसे होणार नाही. गिल आणि अय्यर यांच्याबरोबर सनरायझर्स हैद्राबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा यालाही कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यावेळी त्याच्या वर्तनाबद्दल सामना शुल्काच्या २५ टक्के दंड केला होता आणि त्याचबरोबर शिस्तभंगामुळे एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला. अभिषेकने केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने घेतलेल्या झेलवर नाराजी व्यक्त केली होती.
गिलला झालेली शिक्षा ही त्याच्यासाठी चिंतेची अधिक बाब नसणार, कारण संघाने या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी केल्यानंतर गुजरातने ४ विकेट्स गमावत २१० धावसंख्या उभारली होती. यामध्ये गिलने ४५ चेंडूत ७० धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात दिल्लीसाठी केएल राहुलने चांगली सुरूवात केली होती. त्याने ५२ चेंडूत ९२ धावा केल्या होत्या. डेविड मिलरने २० चेंडूत ४१ धावा करत संघाच्या विजयाच्या अपेक्षा जिंवत ठेवल्या होत्या, मात्र हा सामना दिल्लीने एका धावेने गमावला.
Comments are closed.