तेलंगणाप्रमाणे बिहारमध्ये यश मिळविण्याचा दृढनिश्चय
काँग्रेस कार्यकारिणीची प्रथमच पाटणामध्ये बैठक
वृत्तसंस्था/ पाटणा
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुधवार, 24 सप्टेंबर रोजी पाटणा येथे काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते याप्रसंगी उपस्थित होते. सुमारे साडेचार तास चाललेल्या बैठकीत तेलंगणाप्रमाणेच बिहारमधील विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला एकावन्न जणांनी संबोधित केले. तसेच दोन ठराव मंजूर करण्यात आले असून पहिला राजकीय आणि दुसरा बिहारच्या जनतेला आवाहन करणाऱ्या ठरावाचा समावेश आहे.
सीडब्ल्यूसी बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांना माहिती दिली. सप्टेंबर 2023 मध्ये तेलंगणामध्येही अशीच सीडब्ल्यूसीची बैठक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांत तेथे काँग्रेस सरकार स्थापन झाले. आता, पाटणामध्ये बैठक झाल्यानंतर येथील सरकारचे काउंटडाऊन सुरू झाल्याचे ते म्हणाले. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मतचोरीच्या विरोधात सुरू असलेली मोहीम सुरूच राहील. पुढच्या महिन्यात राहुल गांधी आणखी काही धक्कादायक माहिती उजेडात आणतील, असेही रमेश यांनी जाहीर केले.
पक्षाध्यक्ष खर्गे यांचा जोरदार हल्लाबोल
बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहार सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने नितीश कुमार यांना मानसिकदृष्ट्या निवृत्त मानले आहे. ते त्यांना ओझे मानतात. बेरोजगारी, शेतकरी आणि पूर यासारख्या मुद्यांवरून त्यांनी एनडीएवरही निशाणा साधला. मतदार पडताळणीवरून त्यांनी निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान आंतरराष्ट्रीय मुद्यांवर अपयशी ठरत असल्याचा दावा करताना विदेशातील मित्रांमुळे आज देश संकटात सापडल्याचा आरोपही केला. देश सध्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर अतिशय आव्हानात्मक आणि चिंताजनक काळातून जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या समस्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या अपयश आणि राजनैतिक अपयशाचे परिणाम असल्याचे ते पुढे म्हणाले.
Comments are closed.