देवेन भारती मुंबई पोलिसांचे नवे ‘बॉस’

धडाडीचे आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबई पोलिसांचे नवे बॉस असणार आहेत. देवेन भारती यांनी आज मावळते पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भारती यांनी, शेवटच्या घटकापर्यंत पोलीस सेवा देणार आणि माझा जास्तीत जास्त वेळ मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी राहील, असा विश्वास दिला.
विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी देवेन भारती यांची नियुक्ती करण्याचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. भारती हे सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त असून त्यांना आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्तपद हे अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील आहे.
आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच देवेन भारती ‘इन अॅक्शन’ झाले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. या जबाबदारीला न्याय देण्याचा माझा सर्वतोपरी प्रयत्न राहील, असे भारती म्हणाले. मी पोलीस दलाचा भाग आहेच. आता आयुक्त म्हणून काम करताना जनतेला जी सेवा दिली जाते त्यात अधिक सुधारणा केली जाईल. पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर भर असेल. जी पोकळी असेल ती तंत्रज्ञानाने भरून काढली जाईल, असे भारती यांनी सांगितले.
सायबर गुन्हे, बांगलादेशींविरोधातील कारवाई तीव्र करणार
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. हे गुन्हे रोखण्याबरोबरच गुह्यांतील आरोपींना पकडण्याची मोहीम तीव्र केली जाईल. बांगलादेशी तसेच अन्य बेकायदेशीर वास्तव्य करणाऱया नागरिकांविरोधातील धडक कारवाई यापुढेही सुरू राहील, असेही देवेन भारती यांनी सांगितले.
Comments are closed.