सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश वाऱ्यांना चाप, दौऱ्यांचा सरकारला उपयोग काय होणार? विदेशात ‘मुशाफिरी’ करणाऱ्या बाबूंना सवाल

वारंवार परदेश दौरे करणारे सरकारी अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे राज्याच्या सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश वाऱ्यांना सरकारने चाप लावला आहे. परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील तसेच खासगी संस्थेचा दौरा असल्यास संबंधित संस्थेचे उत्पन्नाचे स्त्रोत सरकारला सादर करावे लागणार आहे.

राज्याच्या सेवेतील काही सनदी अधिकारी आणि सरकारी अधिकारी अभ्यास दौरा आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली वारंवार परदेश दौरे करीत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. परदेश दौऱ्याचे परिपूर्ण प्रस्ताव सरकारला सादर होत नाही. परदेश दौऱ्यापूर्वी सादर होणाऱ्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असतात. अनेकदा विसंगती असते. काही अधिकाऱ्यांची टीमच प्रशिक्षणाच्या नावावर परदेश दौऱ्यावर रवाना होते.

सनदी अधिकारी, सार्वजनिक उपक्रम मंडळे, महामंडळे इत्यादी पदाधिकऱ्यांची टीमच परदौऱ्यावर रवाना होते. या सर्वाचा आता चाप लागणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केले असून अभ्यास दौरा आणि प्रशिक्षण वगळता अन्य दौऱ्यांमध्ये तीन पेक्षा जास्त अधिकऱ्यांचा दौऱ्यात समावेश करू नये.

संस्थेचे उत्पन्नाचा स्त्राएसत शोधणार

अनेकदा सरकारी अधिकारी खासगी संस्थेच्या पैशाने परदेश दौरे करतात. अशा संस्थांच्या उत्पन्नाचा स्त्राएसत शोधण्यात येणार आहे. दौऱ्याचा खर्च खासगी संस्था करणार असल्यास संबंधित संस्थेचा प्रकार व उत्पन्नाचा स्त्राएसत व खर्चाची अंदाजित रक्कम सरकारला सादर करावी लागेल. दौऱ्याचे प्रयोजन व दौरा सरकारला कसा उपयुक्त ठरेल याचीही माहिती द्यावी लागणार आहे. काही अधिकारी परस्पर स्वतःच्या नावाने परदेश दौऱ्याची निमंत्रणे मिळवतात. त्यामुळे दौऱ्याचे निमंत्रण कोणामार्फत आले, निमंत्रण देणाऱ्या संस्थेचा तपशीलही राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे.

सनदी अधिकाऱ्यांना मंत्र्याची मान्यता

काही सनदी अधिकारी मंत्र्यांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे आता सनदी अधिकाऱ्याचा परदेश दौरा असेल तर संबंधित सनदी अधिका-याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागणार आहे. या अटीमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Comments are closed.