मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप,बंगले वाटप करुन ‘संगीत मानापमान’ला आलोय : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस : मराठीतली एक अभिजात कलाकृती ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapmaan) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 10 जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याआधी नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली. मानापमानच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांच्या राजकीय टोलेबाजीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
मी मागच्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खाते वाटप करुन, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन संगीत मानापमानला आलोय, असं म्हणत मिश्किल टीप्पणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. त्याचप्रमाणे त्यांनी संपूर्ण टीमलाही शुभेच्छा दिल्या. मराठी सिनेमांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम करण्याची आमचीही इच्छा आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
‘आमच्याकडे मानापमान मनात होतो आणि…’
मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं की, मी मागच्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खाते वाटप करुन, बंगले वाटप करुन, ऑफिस वाटप करुन संगीत मानापमानला आलोय. आमच्याकडे मानापमान मनात होतो आणि त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की, या क्षणाचा साक्षीदार मी होऊ शकतोय. याचं कारण की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज रुपेरी पडद्यावर नव्या स्वरुपात आपल्याला पाहायला मिळतंय.
‘आम्हालाही असं करावं लागतं…’
पुढे त्यांनी म्हटलं की,सुबोध भावेंनी बालगंधर्व साकारले. त्यामुळे त्यांनी भामिनीही साकारली. आता ते धैर्यधरही साकारत आहेत, हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं आणि पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की, संगीत मानापमान हा 113 वर्षांचा इतिहास आहे. याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत, म्हणजे लोकं असंही सांगतात की, सोन्याचा जो भाव होता, त्याच्याही जास्त दरात या नाटकाची तिकीटं विकली गेलीत. अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी या नाटकाचे प्रयोग करण्यात आले. त्यामुळे एक मोठा इतिहास याठिकाणी आहे. संगीत नाटकांची एक पंरपरा मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली आहे. पण आपलं संगीतही तितकचं अभिजात आहे, नाट्य संगीतही तितकचं अभिजात आहे. या सगळ्या ज्या परंपरा आहे, त्या नवीन स्वरुपामध्ये आपल्यासमोर येणं आवश्यक आहे.
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.