Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray and Sharad Pawar over Pahalgam attack
पहलगाम हल्ल्याप्रकरणी वक्तव्या केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी (24 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दोन्ही अनुपस्थित राहिले. दोन्ही सभागृह नेते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याने ते बैठकीला हजर राहू शकले नाहीत. तर दुसरीकडे पहलगाम घटनेचे राजकारण करू नये, अशी समज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून देण्यात आलेली असतानाही शिवसेना ठाकरे गटाकडून टीका होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या अशा भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray and Sharad Pawar over Pahalgam attack)
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की, सर्वपक्षीय बैठकीला उद्धव ठाकरे गट अनुपस्थित राहिला, पण काँग्रेस आणि एमआयएम पक्षाने समर्थन दिलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाची कुठेतरी वेगळी भूमिका आहे असं वाटतं का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला या गोष्टीचं अतिशय दु:ख आहे की, ते या देशाचा इतिहास विसरले आहेत. या देशाचा इतिहास असा आहे की, युद्धाची वेळ असो, युद्ध सदृश्य परिस्थिती असतो, देशावर हल्ला असो किंवा देशाच्या संदर्भात एखादा विषय असो, या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही. बांग्लादेशच्या युद्धावेळी पक्षापक्षांमध्ये खूप टोकाची भूमिका चालली होती. त्यावेळी देखील दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांना पूर्ण समर्थन दिलं होतं. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं, उपहास करणं, मुर्खासारख्या प्रतिक्रिया सुरू आहेत, या गोष्टीला देशाची जनता माफ करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा – Devendra Fadnavis : राहुल गांधींना न्यायालयाने फटकारले; फडणवीस म्हणतात, रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे…
शरद पवारांबाबत फडणवीस काय म्हणाले?
दरम्यान, शरद पवार यांनी विधान केलं आहे की, काश्मीरमध्ये जो गोळीबार झाला आहे, पर्यटकांवर धर्म बघून गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत. यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, शरद पवार काय म्हणाले, हे मी ऐकलं नाही. पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वत: तिथे होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलं आहे. शरद पवार यांचं तसं मत असेल तर त्यांनी पर्यटकांचे वक्तव्य ऐकावं, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : मग क्रिकेटचे काय करणार? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल
Comments are closed.