Devendra Fadnavis has now announced a second 150-day action plan


विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित 150 दिवसांचा दुसरा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (06 मे) चोंडी (जि. अहिल्यानगर) येथे जाहीर केला.

अहिल्यानगर : विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित 150 दिवसांचा दुसरा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (06 मे) चोंडी (जि. अहिल्यानगर) येथे जाहीर केला. फडणवीस यांनी आज मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर या दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याबाबत सूतोवाच केले. या कृती आराखड्याचा तपशील बुधवारी (07 मे) जाहीर केला जाणार आहे.

चोंडी येथे आयोजित राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी 150 दिवसांच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील 12 हजार 500 शासकीय कार्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली. मंत्रालयातील 48 विभाग या कार्यक्रमात सहभागी झाले. या विभागातील 902 विषयांवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना 706 विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले. यामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आले तर काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले. या कार्यक्रमास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे 150 दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू राहील, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – Devendra Fadnavis : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत फडणवीसांनी सांगितला प्लॅन; एखाद्या वेळेस…

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर हा कार्यक्रम आधारित असेल. विकसित महाराष्ट्र मुद्यांवर 2029, 2035 आणि 2047 अशा तीन टप्प्यांत विभागाचे धोरण काय असेल याबाबत परिमाण निश्चित करण्याचे फडणवीस म्हणाले. 100 दिवसांच्या कार्यक्रमांतून प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झाले. आता नागरिकांना आधिक चांगली सेवा देण्यासाठी हा 150 दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग दाखविल्याबद्दल सर्व मंत्री आणि सचिवांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचा – Local Body Election : राज्य सरकारने आता निवडणूक आयोगाच्या आडून…; काय म्हणाले जयंत पाटील?


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.