भोंदू खरातला ईडी घेणार ताब्यात – देवेंद्र फडणवीस

भोंदू अशोक खरातची एसआयटी चौकशी सुरू असतानाच आता ईडीचीही या कारवाईत एन्ट्री झाली आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांची ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. या चौकशीसाठी ईडी खरातला ताब्यात घेणार आहे. या प्रकरणात जे जे सहभागी असतील, मग ते कुणीही असोत, त्यांचीही चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीतून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींसह सरकारी अधिकाऱ्यांचेही या प्रकरणात कनेक्शन उघड झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आतापर्यंत या प्रकरणात 12  गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती दिली. एसआयटीच्या तपासात काय सापडले याची माहिती योग्य वेळी देऊ, असेही त्यांनी सांगितले.

खरात प्रकरणी ईडी चौकशी करणार का असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उपस्थित केला असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला दुजोरा दिला. खरात याच्या आर्थिक व्यवहारांबाबत स्पष्टता आल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाईल. ईडीकडूनही चौकशी केली जाईल आणि त्याची सुरुवातही झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सीडीआर लीकचीही चौकशी होणार

खरात प्रकरणातील सीडीआर मिळवण्याचा अधिकार फक्त तपास यंत्रणांना आहे, इतर कुणालाही नाही, असे स्पष्ट करतानाच, तो सीडीआर कुणी लीक केला त्याचीही चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कोण कुणाशी बोलले या आधारावर चौकशी होत नाही तर सबळ पुरावा असेल त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल, असेही ते पुढे म्हणाले.

गोदावरी नदी बारा महिने प्रवाहीत राहणार

नाशिक येथे रविवारी अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. त्याप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदी बारा महिने प्रवाहीत राहील, यासाठी उपाययोजना करण्यात येईल. पुंभमेळा हा साधू-महंतांचा आहे, सरकार फक्त व्यवस्था करणार आहे. पुंभमेळ्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. साधूग्रामसाठी कायमस्वरुपी जागा विकत घेण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.