देवाभाऊंचे नागपूर अर्ध्या तासाच्या पावसात बुडाले; घरांत पाणी, रस्ते तुंबले, वाहतुकीचे तीनतेरा

महाविकास आघाडी सरकार एकीकडे विकासाच्या गप्पा मारत असताना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर फक्त अर्ध्या तासाच्या पावसाने बुडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. जोरदार पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले, तर रस्त्यात पाणी तुंबल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले.
हवामान खात्याने गुरुवारी विदर्भ-मराठवाडय़ात विजांसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरवत पावसाने सकाळपासून जोरदार बरसायला सुरुवात केली. विजा आणि गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली. अवघ्या अर्ध्या तासातच रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहनचालकांचीही तारांबळ उडाली.
रेल्वे स्थानक परिसरही जलमय
जोरदार पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरातही मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रेल्वे सब वेमध्येही पाणी शिरले. लोहापूल, नरेंद्र नगर, मेहदीबाग या सब वेमध्ये गुडघाभर पाणी शिरले. त्यामुळे हे सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. विशेष म्हणजे व्हीआयपी लोक राहणाऱ्या भागातही पाणी शिरले. तुंबलेल्या पाण्यातून जाणाऱ्या गाडय़ा बंद पडल्याने त्या ढकलत नेण्याची कसरत चालकांना करावी लागली.
Comments are closed.