भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले…
छगन भुजबळांवर देवेंद्र फडणवीस : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली. या भेटीवेळी राज्यातील सध्याची स्थिती व आपल्या मागण्या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सर्वकाही सांगितलं असून ते 8 ते 10 दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते आज मला भेटले आणि भेटल्यानंतर भुजबळ यांनी माध्यमांना आमच्यात काय चर्चा झाली याबाबत सांगितले आहे. भुजबळ हे आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये त्यांच्या बद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचा देखील महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. स्वतः अजित पवार देखील त्यांची चिंता करतात.
भुजबळांसारखा नेता आमच्यासोबत मैदानात असायला हवा
भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतले नाही, त्यावेळी भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. अजित पवारांनी मला सांगितले की, आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे. त्यामुळे भुजबळांसारखा एक नेता ज्यांना देशाच्या अन्य राज्यात देखील मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचे आहे. मात्र, भुजबळांचे मत वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू आणि भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, या दृष्टीने आम्ही मार्ग काढू, असे त्यांनी म्हटले.
फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, आज मी आणि समीर भुजबळ दोघांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनेक गोष्टींची चर्चा झाली. सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चा झाली. मागील काही दिवसात काय-काय घडलं? आता काय सुरू आहे याबाबत बोलणे झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलंय की, यावेळेस आपल्याला महाविजय मिळालेला आहे. महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले. ओबीसींनी यावेळेस महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे, असे त्यांनी म्हटल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.