अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपात असेल तर मुडदाही खोदून काढू, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला घातपात झाला असेल तर ते शोधून काढण्यासाठी सरकार आकाश पातळ एक करील. यामागे कोणाचा बाप असेल तरी शोधून काढू. घातपात असेल तर मुदडाही खोदून काढू, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहाला दिले.
विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास भाषण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रोहित पवार व अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्यासह अन्य सदस्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी 27 जानेवारी 2026 ते 28 जानेवारी 2026 या दरम्यानचा अजित पवार यांच्या बारामती दौऱयाचा सविस्तर तपशील सभागृहाला सांगितला.
विमानाचे आरक्षण करण्यापासून ते अपघातापर्यंतच्या घटनेबाबतची सर्व तांत्रिक माहिती, विमान आरक्षणाची वेळ, वैमानिकांना विमान उड्डाणाबाबत देण्यात आलेला संदेश आदींची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. ऐनवेळी वैमानिक बदलले नाहीत. आधी राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग यांना वैमानिक म्हणून नेमण्यात आले होते. ओबेरॉय यांनी पोट खराब असल्याचे सांगितल्याने त्यांच्या ऐवजी सुमीत कपूर आणि शांभवी पाठक यांना 27 जानेवारीला रात्री वैमानिक म्हणून नेमले होते. या दोघांची ब्रेथऍनलायझर टेस्ट झाली होती. त्यात अल्कोहोलचा अंश सापडलेला नाही.
दिल्लीतील भेटीनंतर रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणात कर्नाटकात झीरो एफआयआर नोंदवला. त्याबद्दल फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी असा एफआयआर घेण्याचा कर्नाटकला अधिकार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकात या प्रकरणी नोंदवण्यात आलेला झीरो एफआयआर बेकायदेशीर आहे. अपघात प्रकरणात आधी एडीआर (ऑक्सिडेंटल डेथ रिपोर्ट) नोंदविण्यात येतो. त्यानंतर जर अपघात नसून काही घातपात असेल तर तो एडीआरच एफआयआरमध्ये रूपांतरित होऊन त्याचा समावेश दोषारोपपत्रात केला जातो. त्यामुळे एफआयआरपेक्षा आरोपपत्र महत्त्वाचे असते. कर्नाटकात एफआयआर नोंदवून महाराष्ट्रात या प्रकरणाची चौकशी नीट सुरू नाही. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा एफआयआर नोंदविला असेल, असे फडणवीस म्हणाले.
Comments are closed.