वेस्ट इंडिजविरुद्ध कॉनवे-लॅथम जोडीने रचला इतिहास! 95 वर्षांचा जुना विक्रम मोडीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी इतिहास रचला आहे. डेव्हन कॉनवे (Devon Convey) आणि टॉम लॅथम (Tom latham) या जोडीने पहिल्या विकेटसाठी 323 धावांची विक्रमी भागीदारी केली. यासह त्यांनी 95 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 1 बाद 334 धावा केल्या असून कॉनवे 178 धावांवर नाबाद आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात शानदार झाली. कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हन कॉनवे यांनी मिळून 323 धावांची सलामी दिली. वेस्ट इंडिजचे गोलंदाज दिवसभर विकेटसाठी झगडत राहिले, त्यांना दिवसाच्या शेवटच्या सत्रात केवळ एक विकेट मिळवता आली. न्यूझीलंडच्या भूमीवर कोणत्याही जोडीने केलेली ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली आहे. यापूर्वी 1930 मध्ये पहिल्या विकेटसाठी 276 धावांची भागीदारी झाली होती.
ही न्यूझीलंडसाठी कोणत्याही विकेटसाठी केलेली दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. पहिला क्रमांक ग्लेन टर्नर आणि टेरी जार्विस यांच्या नावावर आहे. त्यांनी 1972 मध्ये 378 धावांचा विक्रम केला होता.
टॉम लॅथमने 146 धावा केल्या त्यात 15 चौकार, 1 षटकार समाविष्ट होता तर डेव्हन कॉनवे 178 धावांवर नाबाद असून त्याने आतापर्यंत 25 चौकार मारले आहेत. सध्या कॉनवेला नाईट वॉचमन जॅकब डफी (9 धावा) साथ देत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात देखील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली आहे. या जोडीने भारताच्या रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांचा विक्रम मोडला. रोहित-मयंकने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 317 धावांची भागीदारी केली होती.
Comments are closed.