केदारनाथ धामला भेट देण्यासाठी भक्त रांग

दरवाजे उघडले : 108 क्ंिवटल फुलांनी सजवले मंदिर; पहिल्या दिवशी 10 हजारहून अधिक भाविकांचे दर्शन

वृत्तसंस्था/ देहराडून

चारधाम यात्रेबाबत प्रवाशांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याचदरम्यान केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी उघडण्यात आले. याप्रसंगी मंदिर 54 प्रकारच्या 108 क्विंटल फुलांनी सजविण्यात आले हाते. या पुष्प सजावटीसाठी नेपाळ, थायलंड आणि श्रीलंका सारख्या विविध देशांमधून आणलेली गुलाब आणि झेंडूची फुले समाविष्ट होती. पहिल्या दिवशी सुमारे 10 हजार लोक दर्शनासाठी आले. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी टोकन पद्धतीने दर्शन दिले जात आहे. भाविकांना आता पुढील 6 महिने दर्शन घेता येईल.

केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच भाविकांना मंदिरातील शाश्वत ज्योत तेवत असताना दिसली. यानंतर रुद्राभिषेक, शिवाष्टक, शिव तांडव स्तोत्र आणि केदाराष्टक या मंत्रांचा जप करण्यात आला. कर्नाटकातील वीरशैव लिंगायत समुदायाचे प्रमुख रावल भीमाशंकर हेसुद्धा या सोहळ्यासाठी मंदिरात पोहोचले होते. दरवाजे उघडल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी बाबांना अर्पण केलेले भीष्म शृंगार काढण्यात आले.

आगामी सहा महिने चालणाऱ्या चारधाम यात्रेला बुधवार, 30 एप्रिलपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी भाविकांसाठी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी गंगोत्री धाम गाठून येथे विशेष पूजा केली. पहिली पूजा पंतप्रधान मोदींच्या नावाने करण्यात आली. या मुख्य सोहळ्यानंतर आता केदारनाथचे दरवाजेही उघडण्यात आले असून बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडले जातील. जून ते ऑगस्ट दरम्यान हवामान चांगले राहिले तर यावेळी 25 लाखांहून अधिक लोक केदारनाथ धाममध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी चारधाम यात्रेच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. सुरळीत प्रवासासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पडताळणी मोहिमा देखील सतत राबवल्या जात आहेत. भक्तांच्या सुरक्षेसाठी मार्गांवर आणि मंदिर परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

Comments are closed.