माजी कृषी सचिवांनी दिलेली घोटाळय़ाची फाईल धनंजय मुंडेंनी हरवली!

कृषी साहित्य खरेदीत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टचार धनंजय मुंडे मंत्री असताना झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात लोकायुक्तांपुढे झालेल्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान माजी कृषी सचिव व्ही. राधा यांनी कृषी विभागात झालेल्या घोटाळय़ासंदर्भात तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठविलेली फाइल हरवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शेतकऱयांसाठीच्या योजनेतील नियम धाब्यावर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना कोटय़वधी घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. खुल्या बाजारातील वस्तूंचे दर आणि कृषी खात्याने खरेदी केलेल्या दरात मोठी तफावत असल्याचा आरोप दमानिया यांनी कागदपत्रांसह केला होता. लोकायुक्तांपुढे आज झालेल्या सुनावणीदरम्यान दमानिया यांनी व्ही. राधा कृषी सचिव असताना कृषी विभागातील भ्रष्टाचार आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल त्यांनी मंत्र्यांना पाठवली. मात्र ही फाइल धनंजय मुंडेंनी गायब केल्याचे सांगितले. त्यावर सुनावणीच्या वेळी उपस्थित असलेल्या उपसचिव प्रतिभा पाटील यांनी ही फाइल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे; पण ही फाईल त्यांच्याकडून राजीनाम्यानंतर परत आली नाही, असे स्पष्ट केले. दमानिया यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच यासंदर्भात कृषी विभागाने दिलेले पत्रही त्यानी पोस्ट केले आहे.
एन कृषी सचिव व्ही. राधा यांनी पाठविलेली ती फाइल तत्काळ कृषी विभागाकडे परत पाठविण्यात यावी, असे निर्देश लोकायुक्तांनी धनंज मुंडे यांना दिल आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या पत्रात काय?
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने, कृषी आयुक्तालयाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीन प्र.स. (कृषी) यांनी तत्कालीन मंत्री (कृषी) यांच्याकडे जो अहवाल सादर केलेला आहे त्याबाबतच्या अहवालाची आपण दूरध्वनीद्वारे उपसचिव (कृषी) यांच्याकडे मागणी केलेली आहे. सदर अहवाल या कार्यासनाकडे कार्यवाहीसह परत प्राप्त झालेला नाही. तसेच सदर अहवाल या कार्यासनास उपलब्ध करून देण्याबाबत तत्कालीन मंत्री (कृषी) यांचे खासगी सचिव यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. त्यामुळे, सदर नस्ती उपलब्ध झाल्यानंतर आपणास त्याप्रमाणे कळविण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या कक्ष अधिकारी यांनी पत्राद्वारे दिली आहे.
Comments are closed.