Dhananjay Munde resigned on moral grounds or due to health reasons, Supriya Sules question To Ajit Pawar


पुणे – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या अमानुष मारहणीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जनतेतून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात दिली. तर मुंडे यांनी स्वतः ट्विट करुन या संबंधीची माहिती दिली आहे. मात्र त्यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याची थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे, मात्र धनंजय मुंडे यांच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न देखील नसल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

छगन भुजबळ आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट करावे की, नैतिकता म्हणून राजीनामा दिला की तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला याचे स्पष्टीकरण त्यांच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले पाहिजे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये देखली नैतिकतेच्ाय आधारावरीत राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मात्र मुंडे यांच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा कुठे ही उल्लेख नसल्यामुळे विरोधक संतप्त झाले आहेत.

बीडमधील प्रकरणांवर अमित शहांची भेट घेणार

खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमधील सर्व प्रकरणांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. पीकविमा घोटाळा, हार्वेस्टर घोटाळा, कौटुंबिक छळाचे प्रकरण आणि संतोष देशमुख हत्याकांड या सर्व प्रकरणांवर अमित शहांसोबत चर्चा करणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अजित पवारांवर सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्येची चार्जशीट काल फाइल झाली. आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ते फोटो पाहिले नसतील का? हत्याकांडातील सातवा खूनी गायब आहे. संतोष देशमुख यांना मारहाण होत होती, तेव्हा विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे यांनी वाल्मिक कारडला फोन केले आहेत. त्यानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांना फोन केला आहे. 84 दिवस ही सगळी माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना होती. तरही तुम्ही दडवून ठेवता, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे म्हटले. अजित पवार यांचे नाव न घेता सुप्रिया सुळे म्हणाल्या,
छगन भुजबळ आणि पुण्याचे पालकमंत्री यांना नम्रपणे विचारायचे आहे की, हा राजीनामा नैतिकतेवर आहे की तब्येतीच्या कारणामुळे आहे? धनंजय मुंडे यांचे ट्विट दाखवत त्या म्हणाल्या की, भुजबळ आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे की, राजीनामा नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे.

वाल्मिक कराडला कोठडीत फाइव्हस्टार ट्रिटमेंट

शरद पवार गटाच्या खासदार म्हणाल्या, वाल्मिक कराड ज्या कोठडीत आहे तिथले कॅमेरा का बंद आहे. वाल्मिक कराडला कोठडीत सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांना कित्येक दिवसांपासून हेच सांगण्यासाठी वेळ मागत आहे, मात्र त्यांच्याकडून वेळ मिळत नाही. मुख्यमंत्र्यांना त्यांचे लोक खरी माहिती देत आहे की नाही? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,
अवादा कंपनीकेड खंडणीची मागणी कोणाच्या बंगल्यावर झाली? पीकविमा घोटाळ्याचा प्रश्न संसदेत उपस्थित केला आहे. बीडच्या खासदार आणि आमदारांनी याविरोधात आवाज उठवला आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. खंडणी हा देशात खूप मोठा गुन्हा आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत हा गुन्हा आहे. त्यामुळे ईडी आणि सीबीआयकडे याचा तपास गेला पाहिजे, अशीही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

हेही वाचा : Dhananjay Munde : अजित पवारांचे वक्तव्य आणि धनंजय मुंडेंच्या ट्वीटमध्ये तफावत; राजीनामा नेमका कशामुळे





Source link

Comments are closed.