माझे नाव मराठी क्रीडा पत्रकारांनीच गाजवले! पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळय़ात हॉकीपटू धनराज पिल्लेंकडून क्रीडा पत्रकारांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव

धनराज पिल्ले हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वप्रथम गाजवलेय ते मराठी क्रीडा पत्रकारांनीच. त्यांच्या पत्रकारितेमुळे- प्रेमामुळेच मी आणि माझा खेळ घराघरात पोहोचला. महाराष्ट्राच्या क्रीडा वैभवात क्रीडा पत्रकारांनाही मानाचे पान असले पाहिजे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा क्रीडा पत्रकार हासुद्धा अविभाज्य भाग आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानी हॉकीचा सम्राट धनराज पिल्ले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारप्राप्त क्रीडा पत्रकारांचे काwतुक करताना क्रीडा पत्रकारितेवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.
धनराज पिल्ले हे एका सामान्य हॉकीपटूचे नाव महाराष्ट्रातील क्रीडा पत्रकारांनीच वर्तमानपत्रात झळकावले. 18 वर्षांच्या माझ्यासारख्या युवा हॉकीपटमधील गुण हेरून वर्तमानपत्रात त्याची हेडलाईन बनविणारे हे सगळे माझे पत्रकार मित्रच होते. तुमचे हे प्रेम मी कसे विसरू शकतो, असेही धनराज पिल्ले यावेळी म्हणाले. मराठी क्रीडा पत्रकारांबद्दल आदर असल्यामुळे धनराज थेट बंगळुरूहून मुंबईला पुरस्कार सोहळय़ासाठी आले. पिल्ले पुढे म्हणाले, माझ्या विजयाची एक पत्रकार परिषद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मातोश्री’ बंगल्यावर घेतली होती. यावेळी दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांत आलेली हेडलाईन ‘धनराज पिल्ले यांना 48 तासांत मुंबईत घर’ होती ती खूप मला भावली. अशा अनेक आठवणी त्यांनी पुरस्कार सोहळय़ात ताज्या केल्या.
मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघाच्या वतीने आज गेल्या पाच वर्षांचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि युवा क्रीडा पत्रकारांच्या पुरस्कारांचे एकत्रितपणे वितरण करण्यात आले. आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी तुषार वैती (2021), प्रसाद लाड (2022), जयेंद्र लोंढे (2023), रोहित नाईक (2024) या युवा क्रीडा पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकारांना महेश बोभाटे क्रीडा पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. यात ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला तर शरद कद्रेकर (2021), संजय परब (2022), विजय साळवी (2023) आणि सुभाष हरचेकर (2024) यांचाही सन्मान करण्यात आला.
या सोहळय़ाला ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे, माजी ‘भारत श्री’ विजू पेणकर, दिनेश लाड, उदय देशपांडे, बाळ वाडवलीकर, राणाप्रताप तिवारी, मनोहर साळवी आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचीही उपस्थिती लाभली.
Comments are closed.