धनुष्याचे आर रायफलमधे सवर्ण

हिंदुस्थानी नेमबाज धनुष श्रीकांतने टोकियो येथे सुरू असलेल्या डेफलिंपिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकत हिंदुस्थानच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. 23 वर्षीय धनुषने अंतिम फेरीत 252.2 असे कमाल गुण नोंदवत केवळ डेफलिंपिक्सच नव्हे, तर डेफ फाइनल वर्ल्ड रेकॉर्डही मोडीत काढला. हिंदुस्थानच्या मोहम्मद मुर्तजा वानियाने 250.1 गुणांसह रौप्य पटकावले, तर दक्षिण कोरियाच्या बॅक स्यूंघाक याला 223.6 गुणांसह कांस्य मिळाले.

क्वालिफिकेशनमध्येही रेकॉर्डब्रेक कामगिरी

धनुषने पात्रता फेरीत 630.6 गुणांची जबरदस्त कामगिरी करीत डेफलिंपिक्स रेकॉर्ड प्रस्थापित केला. मुर्तजा 626.3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. अंतिम फेरीत धनुषने पुन्हा एकदा विक्रम मोडीत काढत डेफ फाइनल वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. पुरुष 10 मीटर एअर रायफलमध्ये हे त्याचे कारकिर्दीतील दुसरे डेफलिंपिक्स सुवर्ण होय. 2022 च्या पॅक्सियास डु सुल स्पर्धेत त्याने वैयक्तिक आणि मिक्स्ड टीम अशा दोन्ही प्रकारांत सुवर्ण जिंकले होते.

मिश्र सांघिकमध्ये चौथ्या सुवर्णाची नजर

सोमवारी धनुष महित संधूच्या जोडीदारीत 10 मीटर एअर रायफल मिश्रित टीम इव्हेंटमध्ये उतरणार असून, त्याचे लक्ष्य कारकिर्दीतील चौथे डेफलिंपिक्स सुवर्ण गाठण्याचे आहे. महिला 10 मीटर एअर रायफलमध्ये हिंदुस्थानच्या 20 वर्षीय महित संधूने दमदार नेमबाजी करत 250.5 गुणांसह रौप्य मिळवले. कोमल वाघमारेला 228.3 गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. युक्रेनच्या लिडकोवा वायोलेटाने 252.4 गुणांसह सुवर्ण पदक मिळवले.

Comments are closed.