धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई

धारशिव: धाराशिवमधून (Dharashiv) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील एका कला केंद्राचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. तर पाच कलाकेंद्र चालका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कला केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अचानक धाड टाकली. यानंतर नियम भंग केल्याप्रकरणी पाच कला केंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कलाकेंद्र विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर धाराशीवच्या वाशी येथील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद

बीड जिल्ह्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर धाराशीवच्या वाशी येथील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. कला केंद्राला परवाना देताना घातलेल्या नियमाचे सर्रास उल्लंघन झाले आहे. त्यामुळं पोलिसांकडून चालका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाकाली, पिंजरा, कालिका, गौरी आणि साई कला केंद्राच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसारपोलिसांनी कारवाई केली आहे.

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते. गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला.

महत्वाच्या बातम्या:

Govind Barge Case: नर्तिका पूजाच्या प्रेमात ठार वेडा; कलाकेंद्रा व्यतिरिक्त, घरी तर कधी बीड कधी वैरागच्या लॉजवर भेटायचे, गोविंद बर्गे प्रकरणात नवा खुलासा समोर

आणखी वाचा

Comments are closed.